Home Cities चोपडा मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांना ‘क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार’ जाहीर 

मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांना ‘क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार’ जाहीर 

0
1


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा येथील पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. गेल्या २६ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात सातत्यपूर्ण, समर्पित आणि नावीन्यपूर्ण कार्य करत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा हा गौरव मानला जात आहे. त्यांच्या या पुरस्कारामुळे पंकज शैक्षणिक संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सन १९९९ मध्ये पाटील यांनी पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गणित शिक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चोपडा आणि परिसरातील सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, गणित व विज्ञान विषयांबद्दल आवड निर्माण व्हावी आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळावी, हा त्यांनी ध्यास घेतला. विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दूर करण्यासाठी त्यांनी सकाळी ६ वाजता गणिताचे विशेष वर्ग सुरू केले. तसेच रात्री ८ ते १० या वेळेत विशेष रात्र अभ्यासिकेचे आयोजन केले. औपचारिक आणि अनौपचारिक अध्यापन पद्धतींचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांमध्ये विषयाची समज, अभ्यासाची आवड आणि आत्मविश्वास निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. या प्रयत्नांचे महत्त्वपूर्ण फलित विद्यालयाच्या परीक्षेतील कामगिरीतून दिसून आले. विद्यालयातील चार विद्यार्थी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक प्रज्ञाशोध अर्थात एनएमएमएस परीक्षेत आजपर्यंत तब्बल २८६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. या विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांपेक्षा अधिक शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाने मिळविलेली ही कामगिरी शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाची उपलब्धी ठरली आहे

विद्यार्थ्यांना केवळ शालेय अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठीही त्यांनी प्रोत्साहन दिले. आयआयटी, जेईई, एनटीएस, एनएमएमएस आणि शिष्यवृत्ती परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक संधींची माहिती मिळावी आणि स्पर्धात्मक परीक्षांचा आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. शिक्षण हे केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित राहू नये, तर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातूनही ज्ञान मिळावे, या विचारातून विविध शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात आले. यामध्ये राष्ट्रपती भवन, विविध राज्यांतील औद्योगिक केंद्रे, बेंगळुरू येथील सर एम. विश्वेश्वरय्या विज्ञान संग्रहालय आणि वाघा बॉर्डर अशा ठिकाणांचा समावेश होता. या सहलींमधून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाच्या विविधतेची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली.

पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयाच्या विद्यार्थी पटसंख्येतही मोठी वाढ झाली. गुणवत्तापूर्ण अध्यापन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, नावीन्यपूर्ण उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पालकांचा सहभाग या बाबींना प्राधान्य दिल्यामुळे विद्यालयाची पटसंख्या ३९ वरून आज १ हजार ४०० पर्यंत पोहोचली आहे. हा प्रवास विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. विद्यालयात हरित सेना, पर्यावरण संवर्धन, सामाजिक कार्य, शैक्षणिक सहली आणि विद्यार्थी विकासाशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, पर्यावरणाविषयी संवेदनशीलता आणि जबाबदारीची भावना विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. ‘संस्कारापासून संगणकापर्यंत’ सर्वांगीण शिक्षण देण्याचा संस्थेचा ध्यास प्रत्यक्षात आणण्यासाठी पाटील यांनी सातत्याने योगदान दिले आहे.

या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात संस्थापक अध्यक्ष दादासाहेब डॉ. सुरेश पंडित बोरोले, संस्थेचे संचालक मंडळ, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेच्या शैक्षणिक ध्येयधोरणांनुसार सर्वांना सोबत घेऊन विद्यालयाच्या विकासात पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. राज्य शासनाचा शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पंकज शैक्षणिक संस्थेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष दादासाहेब डॉ. सुरेश बोरोले, संस्थाध्यक्ष भैय्यासाहेब पंकज बोरोले, सर्व संचालक मंडळ, विभागप्रमुख, श्री. एम. व्ही. पाटील, प्राचार्य मिलिंद पाटील, महादेव वाघमोडे, श्री. प्रकाश माळी, सौ. मीना माळी, विविध विभागांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि कर्मचारी यांनी व्ही. आर. पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.


Protected Content

Play sound