तेलतुंबडेंविरोधातील कारवाईचा परदेशी सहाशे विचारवंतांकडून निषेध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भीमा कोरेगावप्रकरणी पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेले दलित विचारवंत आनंद तेलतुंबडे यांच्यावरील कारवाईचा अमेरिका-युरोपमधल्या विविध विद्यापीठांधील ६०० विचारवंतांकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. तेलतुंबडे हे भारतातील एक प्रतिष्ठीत विचारवंत, नागरी हक्क कार्यकर्ते असून केंद्र आणि राज्य शासनाने त्यांच्यावरील कारवाई त्वरीत थांबवावी, अशी मागणी त्यांनी भारत सरकारशी एका जॉईंट स्टेटमेंटद्वारे बुधवारी केली. प्रिंस्टन, हॉवर्ड, येल, ऑक्सफर्ड आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठांतील विचारवंतांचा इंडिअन सिविल वॉच (आयसीडब्ल्यू) या संस्थेमध्ये समावेश आहे.

बिझनेस स्टँडर्डने यासंदर्भात वृत्त दिले आहे. वैध कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत (युएपीए) अग्रगण्य आणि लोकप्रिय विचारवंत तेलतुंबडेंवर पोलिसांकडून दाखल करण्यात आलेला गुन्हा चुकीचा असून हा लोकशाही आणि नागरी स्वातंत्र्यावर घातलेला घाला असल्याचे या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे. भारत सरकारला विनंती करणाऱ्या या याचिकेवर ६०० परदेशी विचारवंतांनी सह्या केल्याचे आयसीडब्ल्यूचे प्रवक्ते प्रा. राजास्वामी यांनी सांगितले. भीमा कोरेगावप्रकरणी सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेची मोडतोड करुन समर्पित मानवाधिकार कार्यकर्त्यांवर आणि भारतीय समाजासाठी मोलाची देणगी असलेल्या विचारवंतांवर कारवाई केली जात आहे, असे अमहर्स्ट येथील मॅच्युसेट विद्यापीठातील विचारवंत संगीता कामत यांनी म्हटले आहे. दलित समाजातील एक मोठे विचारवंत म्हणून तेलतुंबडेंचा अनेकांनी गौरव केला आहे. त्यांच्या लिखाणाने लोकशाहीवरील समिक्षणात्मक चर्चांना, जागतिकीकरण आणि सामाजिक न्याय प्रक्रियांमध्ये भर घातली आहे. २८ ऑगस्ट २०१८ रोजी तेलतुंबडेंच्या घरी बेकायदापद्धतीने राज्य पोलिसांकडून छापेमारी करण्यात आल्याचे ‘इंडिअन सिविल वॉच’ या उत्तर अमेरिकास्थित संघटनेमार्फत सादर करण्यात आलेल्या जॉईंट स्टेटमेंट म्हटले आहे.

Add Comment

Protected Content