शेतकर्‍यांच्या अविरत संघर्षाची दखल घेण्याचा प्रयत्न स्तुत्य : पालकमंत्री

जळगाव प्रतिनिधी । शेतकरी हा आपल्या कामाशी एकनिष्ठ असतो. तो अविरतपणे कष्ट करतो, अनेक अडचणींवर मात करतो. मात्र असे असूनही अडचणी त्याची पाठ सोडत नाहीत. याचा विचार करता आयोजकांनी  सातत्याने परिस्थितीशी दोन हात करणार्‍या शेतकर्‍यांची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्याचा घेतलेला कार्यक्रम हा अतिशय स्तुत्य असून तो खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांचा सन्मान करणारा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते जळगाव येथे  फंटॅस्टीक फार्मर्स पुरस्काराच्या वितरण समारंभात बोलत होते.

फंटॅस्टीक फार्मर्स पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याच्या अंतर्गत जिल्ह्यांतील उत्कृष्ट शेती करणार्‍या व कोरोनाच्या काळातही न डगमगता काळ्या आईची सेवा करणार्‍या ४० शेतकर्‍यांचा सपत्नीक सत्कार जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रत्येक शेतकर्‍यांना श्रीफळ व ट्रॉफी व गुलाब बुके देऊन करण्यात आला.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, शेतकर्‍यांच्या कार्याला सलाम करण्याचा हा एक छोटासा मात्र अतिशय महत्वाचा प्रयोग आहे. व्यापारी हा आपला धंदा बदलत असतो. तोटा आल्यास तो खचितच आपला व्यवसाय बदलतो. मात्र शेतकरी हा जहा खोया है वहा पाना है या विचारसरणीनुसार काम करतो. जिथे गमावले तिथेच कमावण्याचा प्रयत्न करतो. शेतकरी हा खूप प्रयत्नशील असतो. तो प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. हा समाधानी प्राण्याचा सत्कार आहे. शेतकरी हा खूप अल्पसंतुष्ट आहे. त्याला गाड्या-घोड्या नको. कुटुंबाला दोन घास हवेत, थोडे चांगले वातावरण हवे इतकीच त्याची अपेक्षा असते. आपल्या जिल्ह्यातील शेतकरी हा संकटांनी घेरलेला आहे. केळीचा पीक विमा असेल की, लाल्या रोग, शेतकरी हा कायम संकटांनी घेरलेला असतो. मात्र त्याला जेव्हा काही खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा लिंकींगचा प्रश्‍न येतोच. या प्रकारावरही शेतकरी मात करत असतो असे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्री महाजन, प्रा. डी.डी. बच्छाव , शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. माने हर्षल , डॉ. भूषण मगर, अमर कुकरेजा, संजय अग्रवाल, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्यासह जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आर. जे. देवा व श्रीमती टिया यांनी केले. आभार विवेक पॉल यांनी मानले.

Protected Content