Home क्राईम दहावीच्या विद्यार्थ्यावर चॉपरने जीवघेणा हल्ला; दोन दिवसांपूर्वीच्या वादातून थरारक घटना

दहावीच्या विद्यार्थ्यावर चॉपरने जीवघेणा हल्ला; दोन दिवसांपूर्वीच्या वादातून थरारक घटना

0
13

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात शाळकरी विद्यार्थ्यांमधील किरकोळ वादाने गंभीर स्वरूप घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुसुंबा येथील दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील एका विद्यार्थ्याने चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या बरगडीवर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी संबंधित विद्यार्थ्यांमध्ये मारामारी झाली होती. याच घटनेचा राग मनात धरून पुन्हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. आयोध्या नगरातील श्रीराम मंदिर तसेच बी.यू.एन. रायसोनी शाळेजवळ सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वादाचे पर्यवसान हल्ल्यात झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यावर चॉपरने वार करण्यात आल्याचा आरोप आहे. यामध्ये त्याच्या बरगडीच्या भागाला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत विद्यार्थ्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली. शाळकरी विद्यार्थ्यांमधील वाद एवढ्या टोकाला जाऊन हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा आणि परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, जखमी विद्यार्थ्याचे वडील गजानन प्रभाकर भोपळे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित विद्यार्थ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांकडून तक्रारीच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात येत असून, घटनेमागील नेमके कारण आणि हल्ल्याची परिस्थिती तपासली जात आहे.


Protected Content

Play sound