Home Cities अमळनेर मंगरूळ–शिरुड रस्ता बनला ‘मृत्यूचा सापळा’ ; माजी सरपंचांचा स्वखर्चाने पुढाकार

मंगरूळ–शिरुड रस्ता बनला ‘मृत्यूचा सापळा’ ; माजी सरपंचांचा स्वखर्चाने पुढाकार

0
67


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील शिरुड ते मंगरूळ मार्गाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, अर्धवट झालेल्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहनचालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. चार किलोमीटरच्या या रस्त्यापैकी केवळ दोन किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. उर्वरित मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.

मंगरूळ, शिरुड, कावपिंप्री यासह परिसरातील अनेक गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र रस्त्याची योग्य देखभाल आणि संपूर्ण दुरुस्ती न झाल्याने वाहनचालकांना खड्ड्यांमधून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे. दुचाकीस्वारांसाठी तर ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत असून, खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. नुकत्याच झालेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसामुळे रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने त्यांची खोली आणि आकार वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत जोखमीचे ठरत आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविताना वाहनांचे अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संपूर्ण मार्गाची दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र अद्याप अपेक्षित पातळीवर काम न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने शिरुडचे माजी सरपंच महेंद्र पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने रस्त्यावरील धोकादायक खड्डे आणि साईटपट्ट्या बुजविण्याचे काम हाती घेतले. त्यांनी मुरूम टाकून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली असून, यामुळे काही प्रमाणात वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. माजी सरपंच महेंद्र पाटील यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. मात्र हा तात्पुरता उपाय असून संपूर्ण रस्त्याची कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती होणे गरजेचे आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करावे आणि पावसाळ्यात नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


Protected Content

Play sound