Home Cities जळगाव अतिक्रमण जैसे थे तरीदेखील आसोदा रस्त्याच्या कामाची घाई ; आसोदा-भादली संयोजन समितीचा...

अतिक्रमण जैसे थे तरीदेखील आसोदा रस्त्याच्या कामाची घाई ; आसोदा-भादली संयोजन समितीचा मनपाला आंदोलनाचा इशारा

0
12

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महर्षी वाल्मीकी पुल ते आसोदा उड्डाणपुलादरम्यान जैनाबाद रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम अतिक्रमण न हटवताच सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याने आसोदा-भादली संयोजन समितीने संताप व्यक्त केला आहे. अतिक्रमणाची समस्या कायम असताना रस्त्याचे काम सुरू करू नये, अशी मागणी समितीने केली असून, मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

शासनाकडून या रस्त्याच्या कामासाठी निधी प्राप्त झाला असून निविदा प्रक्रियाही पूर्ण झाल्याचे समितीचे म्हणणे आहे. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी रस्त्यावरील बांधकामे, झोपडपट्ट्या आणि इतर अतिक्रमणे हटविणे आवश्यक आहे. सध्या रस्त्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असल्याने भविष्यात वाहतूक कोंडी तसेच अपघातांचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता समितीने व्यक्त केली आहे. आसोदा-भादली परिसराला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असून भविष्यात या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याचे काम करण्यापूर्वी अतिक्रमण हटवून रस्त्याची आवश्यक जागा पूर्णपणे मोकळी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अतिक्रमण कायम ठेवून रस्ता तयार केल्यास भविष्यात रस्त्याची रुंदी कमी पडून वाहतुकीच्या समस्येला पुन्हा सामोरे जावे लागू शकते, असे समितीने म्हटले आहे.

समितीच्या प्रमुख मागण्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अतिक्रमण नियमानुसार हटविण्याचे आदेश देणे, झोपडपट्टी वसाहतींचे पुनर्वसन करून तातडीने अतिक्रमण काढणे, तसेच रस्ता व दुभाजकातील विजेचे खांब स्थलांतरित करण्याचा आराखडा मंजूर करून त्याची तातडीने अंमलबजावणी करणे यांचा समावेश आहे. जागा पूर्णपणे मोकळी केल्याशिवाय रस्त्याचे काम सुरू करू नये, अशी ठाम भूमिका समितीने घेतली आहे. दरम्यान, अतिक्रमण न हटविता काम सुरू केल्यास आठ गावांचे ग्रामस्थ एकत्र येऊन महापालिकेविरोधात बेमुदत धरणे आंदोलन करतील, असा इशारा आसोदा-भादली संयोजन समितीने दिला आहे. या संदर्भात समितीने प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. शरद नारखेडे, उमेश वाघसकर, संजीव पाटील, किरण नेहते, कुंदन भोळे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे ही मागणी केली आहे.


Protected Content

Play sound