फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक योग दिनानिमित्त वढोदा येथील श्री निष्कलंक धाममध्ये पार पडलेल्या भव्य योग कार्यक्रमात शेकडो नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले. निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात योगाभ्यासासोबतच पर्यावरण रक्षणाचे आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
21 जून रोजी सकाळी 7:30 वाजता श्री निष्कलंक धाम वढोदा येथे आयोजित कार्यक्रमात महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “माणसाच्या जीवनात खरी संपत्ती ही त्याचे आरोग्य आहे. त्यामुळे शरीर सुदृढ राखण्यासाठी दररोज किमान अर्धा तास योगाभ्यास आवश्यक आहे.” त्यांनी प्रत्येकाने किमान एक झाड लावावे, प्रदूषणमुक्त जीवनशैली अंगीकारावी आणि स्वच्छता पाळण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही यावेळी केले.
कार्यक्रमात आचार्य सचिन पाटील यांनी योगाच्या विविध क्रियांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी योग प्राणायामाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवत त्याचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम विशद केले. विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी योगाभ्यास करत उत्साहाने सहभाग घेतला. विशेष म्हणजे कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व वयोगटातील व्यक्तींनी नियमित योग करण्याचा संकल्प केला.
तुलसी हेल्थ केअर सेंटरच्या सहकार्याने पार पडलेल्या या उपक्रमात परिसरात सकारात्मक ऊर्जा अनुभवली गेली. पर्यावरण पूरक विचार, स्वच्छतेचे महत्त्व आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचा संगम घडवून आणत जागतिक योग दिनाची खरी भावना येथे उमटली.