रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील केऱ्हाडे गावात एका वृद्ध महिलेच्या घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी, २१ एप्रिल रोजी मध्यरात्री चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केऱ्हाडे येथील रहिवासी सखुबाई सोमा सोनवणे (वय ७०) या आपल्या कुटुंबीयांसह राहतात. २१ एप्रिल रोजी मध्यरात्री घरातील सर्वजण गाढ झोपेत असताना, अज्ञात चोरट्यांनी घराचा फायदा घेत आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी घरात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर पीडित वृद्ध महिलेने तातडीने रावेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून रावेर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील हे करत आहेत.



