अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थानी मानल्या जाणाऱ्या श्री मंगळग्रह मंदिरात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. मंदिराच्या शांत, नैसर्गिक वातावरणात योग साधनेचा अनुभव घेत भक्तांनी शारीरिक-मानसिक आरोग्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले.
श्री मंगळग्रह मंदिर ट्रस्टचे सहसचिव दिलीप बहीरम यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जागतिक स्तरावर योगाभ्यासाचा वाढता प्रभाव आणि भारताच्या सांस्कृतिक वारशातील योगाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर मंदिरात विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले.
योग प्रशिक्षक आशिष चौधरी व दिलीप बहीरम यांच्या पुढाकाराने भक्तांना योगाचे विविध आसने, श्वसन क्रिया व ध्यानाभ्यास शिकवण्यात आले. या सत्रात मंदिराचे सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त अनिल अहिरराव, सेवेकरी आ. टी. पाटील, व्हि. व्हि. कुलकर्णी, बाळा पवार यांच्यासह अनेक सेवेकरी सहभागी झाले. मंदिराच्या परिसरातील शांतता आणि सकारात्मक ऊर्जा यामुळे साधनेचा अनुभव अधिक समृद्ध झाला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी योगामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मन स्थिर राहते आणि जीवनशैलीत सकारात्मकता येते, याचा अनुभव घेतला. विशेष म्हणजे, स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून योग दिनाच्या महत्त्वाला प्रतिसाद दिला.
योग दिनानिमित्त मंदिरात जे साधन सुरु झाले, ते आता नियमित स्वरूपात चालू ठेवण्याची चर्चाही सेवेकऱ्यांमध्ये झाली. समाजातील आरोग्यपूर्ण जीवनशैली रुजवण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरू शकते, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला.