जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील एका एचआयव्ही बाधित महिलेवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गोदावरी फाउंडेशनच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांतर्गत ही अत्यंत संवेदनशील आणि आव्हानात्मक सर्जरी पार पडली असून, यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक बांधिलकीचे उदाहरण पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
ही शस्त्रक्रिया ह भ प जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. नितु पाटील आणि त्यांच्या कुशल टीमने अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्व सुरक्षितता नियमांचे पालन करत यशस्वीरीत्या पूर्ण केली. एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने अनेक ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यास टाळाटाळ करण्यात आली होती. मात्र, या रुग्णालयात सर्व वैद्यकीय जोखीम स्वीकारून मोफत उपचार देण्यात आले.

खाजगी रुग्णालयात अशा शस्त्रक्रियेसाठी साधारणतः ५० ते ८० हजार रुपयांचा खर्च येतो. मात्र, गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य करण्यात आली. “मोतीबिंदू मुक्त रावेर तालुका” या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. या शस्त्रक्रियेत डॉ. नेहा नारखेडे, डॉ. शुभम भारसके, डॉ. गौरव पाटील, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. कीर्ती महाजन तसेच संजय महाजन, सबा, तृप्ती, प्रतीक्षा, स्वाती आणि इतर स्टाफ यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
एचआयव्ही बाधित रुग्णांबाबत समाजात अजूनही भीती आणि गैरसमज असताना, या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील सकारात्मक दृष्टिकोन स्पष्ट झाला आहे. या घटनेमुळे अशा रुग्णांनाही सुरक्षित आणि दर्जेदार उपचार मिळू शकतात, हे अधोरेखित झाले आहे. या उपक्रमामुळे समाजात आरोग्यसेवेबाबत विश्वास वाढत असल्याचेही दिसून येत आहे.
या शस्त्रक्रियेबाबत बोलताना डॉ. नितु पाटील यांनी सांगितले की, “रुग्ण एचआयव्ही बाधित असल्यामुळे ही शस्त्रक्रिया जोखमीची होती, मात्र योग्य काळजी आणि वैद्यकीय प्रोटोकॉल पाळून आम्ही ती यशस्वी केली. रुग्णाला दृष्टी मिळवून देणे हे आमचे कर्तव्य होते.”
तर डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, “असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी हे ध्येय ठेवून आम्ही मोतीबिंदू मुक्त रावेर तालुका हा उपक्रम सुरू केला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचावी हाच आमचा उद्देश आहे. या महिलेवर झालेली यशस्वी शस्त्रक्रिया हीच या शिबिराची खरी फलश्रुती आहे.”



