मुंबई, वृत्तसंस्था | उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी भाजपा सरकारच्या अनेक योजनांना ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला होता. यावरून आता भाजपा नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. चांगल्या योजना बंद करून उद्धव ठाकरे सुडाचे राजकारण करत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामे पुसून टाकण्याचा हा अट्टहास असल्याचा आरोप बोंडे यांनी केला.
जलयुक्त शिवार योजना थांबवणे, स्थगिती देणे आणि निधी बंद करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देणे ही चिंतेची बाब आहे. शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागातील जनतेच्या तोंडचे पाणी पळवण्याचे काम केले आहे. ही योजना आता रोजगार हमी योजनेत टाकण्यात आली आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांमध्ये होणारी कामे आता २५ वर्षे चालणार आहेत, असे बोंडे म्हणाले.
एकीकडे शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणतात. तर दुसरीकडे जलयुक्त शिवार सारख्या योजनांना स्थगिती देऊन त्यांना चितेत टाकण्याचेच काम त्यांनी केले असल्याचे ते म्हणाले. ग्रामविकास आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून आमदारांच्या मागणीनुसार मंजूर करण्यात आलेल्या हजारो कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता.
३१ डिसेंबर रोजी जलयुक्त शिवार योजनेची मुदत संपली आहे. यानंतर सरकारने त्याला मुदतवाढ दिलेली नाही. तसेच यापुढे या योजनेला निधी दिला जाणार नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे. रोजगार हमी व्यतिरिक्त जलयुक्तसाठी निधीची तरतूद झाल्यास तो गैरव्यवहार समजून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.