मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | टेक क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या ओपनएआय कंपनीचा चॅटजीपीटी हा जगातील पहिला एआय चॅटबोट पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. चॅटजीपीटीच्या लाँचनंतर अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी स्वतःचे एआय चॅटबॉट्स सादर केले. त्यामुळे ओपनएआय च्या चॅटबॉटसमोरील स्पर्धा अधिकच तीव्र झाली होती. गुगल, ॲपल, सॅमसग आणि मेटा सारख्या दिग्गजांनी त्यांच्या एआय सादर करताच चॅटजीपीटीकडे लोकांचे लक्ष काहीसे कमी झाले होते.
मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर ओपन एआयच्या सीईओने घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय चॅटजीपीटीसाठी गेमचेंजर ठरला. कंपनीने त्यांच्या अॅपमध्ये ‘Ghibli स्टाईल इमेज जनरेटर’ हे भन्नाट आणि क्रिएटिव्ह फीचर लाँच केले आणि जगभरात याची जोरदार चर्चा सुरू झाली. या नव्या फीचरमुळे चॅटजीपीटीने पुन्हा एकदा आपली छाप पाडत, जोरदार कमबॅक केला आहे.
हे फीचर वापरून युजर्स Studio Ghibli च्या अॅनिमेशन शैलीत आपले फोटो तयार करू शकतात. या अनोख्या संकल्पनेने नेते, अभिनेते, कलाकार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससह सामान्य युजर्सनाही अक्षरशः वेड लावले. सोशल मीडियावर ‘जिबली स्टाईल’ इमेजचा ट्रेंड प्रचंड व्हायरल झाला. यामुळे हजारोंनी नव्हे, तर लाखोंनी चॅटजीपीटी अॅप डाऊनलोड केले. ॲप फिंगर्सच्या अहवालानुसार, मार्च 2025 मध्ये चॅटजीपीटीने 46 दशलक्ष म्हणजेच 4.6 कोटी डाऊनलोड्सचा आकडा गाठत इंस्टाग्राम आणि टिकटॉक सारख्या लोकप्रिय अॅप्सना मागे टाकले आहे. १.३ कोटी आयओएस युजर्संनी हे डाऊनलोड केले असून ३.३ कोटी ॲडरॉईड युजर्संनी चॅटजीपीटी डाऊनलोड केले आहे.
याच कालावधीत इंस्टाग्रामचे एकूण 46 दशलक्ष डाऊनलोड्स असून त्यात iOS वर 5 दशलक्ष, तर Android वर 41 दशलक्ष डाऊनलोड्स आहेत. TikTok थोडक्यात मागे पडत 45 दशलक्ष डाऊनलोड्सवर थांबले आहे.फेब्रुवारी ते मार्च दरम्यान चॅटजीपीटी अॅपच्या डाउनलोडमध्ये तब्बल 28% ची वाढ झाली. 2024 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 2025 मध्ये 148% वाढ नोंदवली गेली आहे.
ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रॅड लाइटकॅप यांनी नुकताच एक डेटा शेअर केला आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे दिसते की Ghibli इमेज जनरेशन फीचर सुरू झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात 1.3 कोटी युजर्सनी 700 दशलक्षांहून अधिक प्रतिमा तयार केल्या आहेत. चॅटजीपीटी केवळ एक चॅटबॉट न राहता आता युजर्ससाठी एक संपूर्ण क्रिएटिव्ह टूल बनू लागला आहे. नव्या अपडेट्समुळे युजर्स त्याचा वापर अधिक सर्जनशीलतेने आणि मजेदार पद्धतीने करत आहेत.या अभूतपूर्व कमबॅकनंतर एआय च्या शर्यतीत चॅटजीपीटी पुन्हा आघाडीवर येण्याची शक्यता आहे, आणि यात शंका नाही की ओपनएआय चा हा प्रयोग एआय जगतात नवा ट्रेंड सेट करणार आहे.