पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भडगाव येथे रॉयल ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय नाईट क्रिकेट टर्फ टुर्नामेंटमध्ये पाचोऱ्याच्या इनोव्हेटर्स संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण बारा नामवंत संघांनी भाग घेतला होता.
अंतिम सामन्यात चुरशीची झुंज पाहायला मिळाली. पाचोरा देशमुख रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या अंतिम लढतीत इनोव्हेटर्स संघाने केवळ ३ धावांनी विजय मिळवत स्पर्धेचा मानकरी ठरला. विजेत्या संघाला ११,००० रुपये रोख रक्कम व भव्य चषक देऊन गौरवण्यात आले. या निर्णायक सामन्यात शानदार कामगिरी करणारा नयन लक्ष्मण सूर्यवंशी हा खेळाडू सामनावीर म्हणून गौरवला गेला. त्याच्या खेळातील समतोल आणि आक्रमकतेची विशेष चर्चा झाली.
इनोव्हेटर्स संघाकडून प्रशांत देवरे, महेंद्र पाटील, कुलदीप पाटील, नयन सूर्यवंशी, आयुष पटवारी, चेतन चित्ते, विशाल पाटील, देवा परदेशी, जयेश पाटील व शुभम कदम यांनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावली. या विजयामुळे पाचोरा शहराच्या क्रिकेट क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले असून, विजयी संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.