जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील लोंढरी येथे एका शेतकऱ्याच्या शेतात कापून ठेवलेला मका अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या आगीत ज्ञानेश्वर तुकाराम शेळके या शेतकऱ्याचा सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचा २०० क्विंटल मका जळून खाक झाला. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेळके यांनी कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र वेळीच गावकऱ्यांनी त्यांना रोखले.
मिळालेल्या माहितीनुसार, लोंढरी येथील शेतकरी ज्ञानेश्वर शेळके यांनी आपल्या शेतातील मक्याचे पीक कापून ढिग करून ठेवले होते. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या शेतात आग लावल्याने २०० क्विंटल मका पूर्णपणे जळून गेला. या नुकसानीमुळे शेळके आर्थिक संकटात सापडले. डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत त्यांनी अत्यंत टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गावातील लोकांनी वेळीच धाव घेत ज्ञानेश्वर शेळके यांना आत्महत्येपासून परावृत्त केले. घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने शेळके यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी शेळके यांना मानसिक आधार दिला आणि धीर धरण्यास सांगितले. महाजन यांच्या आश्वासक संवादामुळे शेळके यांचे मनपरिवर्तन झाले आणि त्यांनी आत्महत्येचा विचार सोडला.
ज्ञानेश्वर शेळके यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री महाजन यांनी शेळके यांना धीर देत, “आपण काळजी करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा,” असे मदतीचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, शेतकऱ्याच्या मक्याला आग लावल्याच्या घटनेप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकऱ्याला तातडीने मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.