जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील विठ्ठल वाडी येथे एका तरुणाच्या घरातून दरवाजाचे कडी-कोयंडा तोडून साडेचार हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिवारी, ५ जुलै रोजी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, भूपेश अरुण चव्हाण (वय २४, रा. विठ्ठलवाडी, निमखेडी शिवार, जळगाव) हा तरुण आपल्या कुटुंबासह येथे राहतो आणि शेती करून उदरनिर्वाह करतो. २६ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान भूपेशचे घर बंद असताना, अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटात ठेवलेली साडेचार हजार रुपयांची रोकड चोरून चोरट्यांनी पोबारा केला.
ही घटना उघडकीस आल्यानंतर भूपेशने सर्वत्र पैशांचा शोध घेतला, परंतु त्याला काहीही सापडले नाही. अखेर, त्याने शनिवारी रात्री जळगाव तालुका पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण इंगळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.