रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सावदा येथे प्रभाकर बुला हॉलमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ताप्ती व्हॅली रावेर, सावदा, फैजपूर आणि यावल शाखेतर्फे भव्य वैद्यकीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुनीता वारके होत्या. विविध वैद्यकीय विषयांवर तज्ज्ञांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेतील प्रमुख आकर्षण ठरले ते हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुनील चौधरी यांचे मार्गदर्शन. त्यांनी ‘सुप्त क्षयरोग’ (लेटन्ट ट्युबरक्युलोसिस) या विषयावर सखोल माहिती देताना सांगितले की, “सुप्त क्षयरोग वेळीच ओळखल्यास आणि त्यावर तातडीने उपचार घेतल्यास तो बरा होऊ शकतो.” त्यांनी रोगाच्या निदान, प्रतिबंधक उपाययोजना आणि उपचारपद्धती यावर सविस्तर माहिती दिली. क्षयरोगासंदर्भातील समाजातील गैरसमज दूर करणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यशाळेत बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश भोसले यांनी ‘ऑटिझम’ या विषयावर मांडणी करताना बालवयातील लक्षणांची ओळख, वेळेवर उपचारांची आवश्यकता आणि पालकांची भूमिका यावर प्रकाश टाकला. आयएमएचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील यांनी अशा कार्यशाळा लोकसेवेसाठी महत्त्वाच्या असल्याचे सांगून, विविध विषयांतील तज्ज्ञांना एकत्र आणून ज्ञानवृद्धी साधण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या दरम्यान, विविध वैद्यकीय शिक्षणात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या डॉक्टरांचा आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. त्वचारोग शिक्षणात उच्च श्रेणी मिळवणाऱ्या डॉ. नुपूर वारके, जेईई मध्ये यशस्वी ठरलेले चिन्मय महाजन, डी.एम. कार्डिओलॉजीसाठी प्रवेश मिळवलेली डॉ. वृषाली सरोदे आणि एम.डी. मेडिसिन मध्ये प्रवेश घेणारे डॉ. स्वराज पाटील यांच्या यशाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुचिता कुयटे आणि डॉ. उमेश पिंगळे यांनी तर आभार प्रदर्शन विशाल जाधव यांनी केले. या कार्यशाळेला IMA च्या विविध शाखांतील अनेक पदाधिकारी आणि सदस्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. उपस्थित मान्यवरांमध्ये डॉ. योगिता पाटील, डॉ. मीनल दलाल, डॉ. अतुल सरोदे, डॉ. योगेश महाजन, डॉ. सुरेश महाजन, डॉ. प्रवीण चौधरी, डॉ. मिलिंद वानखेडे, डॉ. खाचणे, डॉ. श्री खासणे, डॉ. व्ही. जी. वारके, डॉ. अनिता पाटील, डॉ. किशोर महाजन, डॉ. गुलाबराव पाटील, डॉ. दिगंबर पाटील, डॉ. दत्तप्रसाद दलाल, डॉ. चेतन कोळंबे, डॉ. तुषार पाटील, डॉ. संगीता महाजन, डॉ. दिलीप हटकर, डॉ. निलेश पाटील, डॉ. प्रफुल पाटील, डॉ. पंकज तळेले, डॉ. सचिन पाटील, डॉ. राजेश चौधरी, डॉ. अभिजीत सरोदे, डॉ. संकेत भंगाळे यांचा समावेश होता.
संपूर्ण कार्यशाळा वैद्यकीय ज्ञानाच्या देवाणघेवाणीचा एक उत्कृष्ट मंच ठरली. सुप्त क्षयरोगासारख्या गंभीर आजारावर वेळेत उपचाराचे महत्त्व, तसेच बालरोग आणि त्वचारोग क्षेत्रातील प्रगतीमुळे ग्रामीण भागात आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यास मदत होणार असल्याचे चित्र या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.