अडावद – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील अडावद गावातील श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या शामराव येसो महाजन विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक भक्तीमय उत्सवाला सुरुवात झाली. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सहभागातून विठ्ठल नामाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडला.
शामराव येसो महाजन विद्यालय व आदर्श प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल रखुमाईच्या प्रतिमा असलेली पालखी सजवण्यात आली होती. विविध फुलांच्या माळांनी सजवलेल्या तुळशी वृंदावनासह या पालखीला विद्यार्थ्यांनी आपल्या खांद्यावर घेतले आणि संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. पालखी पूजन पालकांच्या हस्ते करण्यात आले.
मिरवणुकीच्या सुरुवातीला आदर्श प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांचे लेझीम पथक होते, जे आपल्या तालावर उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींनी विठ्ठल भक्तीवर आधारित गीतांवर प्रत्येक चौकात सुंदर नृत्य सादर केले. या संपूर्ण सोहळ्यात दहीवद येथील माऊली बँड पथकाने सुमधुर अभंग सादर करत भक्तीच्या वातावरणात भर घातली.
ही पालखी शाळेपासून निघून दुर्गा देवी चौक, श्री संत सावता महाराज मंदिर, श्रीराम मंदिर, महात्मा फुले रोड, राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, ग्रामपंचायत चौक, विठ्ठल मंदिर, सुभाष चौक, आणि पुन्हा विद्यालय प्रांगणात परत आली. संपूर्ण मार्गावर ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मिरवणुकीदरम्यान अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, तसेच पोलीस व गृहरक्षक दलाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक आर. के. पिंपरे यांच्यासह उपशिक्षक व्हि. एम. महाजन, एस. जी. महाजन, एम. एन. माळी, पी. आर. माळी, एस. बी. चव्हाण, एस. के. महाजन, पी. एस. पवार, लिपिक सी. एस. महाजन, इश्वर मिस्तरी, रवींद्र महाजन, कैलास महाजन, अशोक महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डि. बी. महाजन, आर. जे. महाजन, एस. टी. महाजन, वाय. एल. साळुंखे, डि. आर. वाघ, कामिनी चौधरी, पुनम सुतार यांनीही परिश्रम घेतले.
संपूर्ण अडावद गाव विठ्ठलनामात रंगून गेला होता. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे हा सोहळा एक शाळा आधारित सामाजिक-धार्मिक उत्सव ठरला आणि त्यातून संस्कारक्षम भावी पिढी घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले.