धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धरणगाव येथे आयोजित अखंड नाम-जप यज्ञ सप्ताहाचा सांगता सोहळा १५ एप्रिल रोजी अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सात दिवस चाललेल्या या आध्यात्मिक सोहळ्याने संपूर्ण शहरात श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्मिक उर्जेची अनुभूती निर्माण केली असून भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दि. ९ ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, दिंडोरी प्रणित यांच्या वतीने हा सप्ताह आयोजित करण्यात आला होता. सप्ताहाची सुरुवात ग्रामदेवता पूजन आणि मंडप उभारणीने झाली. पुढे मंडळ स्थापना, अग्निस्थापना, हवन आणि नित्य स्वाहाकार यांसारख्या विधींनी कार्यक्रमाला वेग आला. गणेश याग, चंडी याग, रुद्रयाग, स्वामी याग, गीताई याग आणि मल्हारी याग यांसारख्या विविध वैदिक विधींचे शास्त्रोक्त आयोजन करण्यात आले.

दररोज सकाळी सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण, भूपाळी आरती, नित्य यज्ञकर्म आणि महानैवेद्य आरती पार पडत होती. विशेष म्हणजे, सामुदायिक गुरुचरित्र पारायणात तब्बल २०३ भाविकांनी सहभाग घेत भक्तीचा अद्वितीय अनुभव घेतला. दुपारच्या सत्रात स्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती आणि रुद्र पठण यामुळे आध्यात्मिक वातावरण अधिक गहिरं झालं.
सायंकाळच्या सत्रात औदुंबर प्रदक्षिणा आणि आरतीमुळे भक्तिमय वातावरण कायम राहिले. दरबारातील प्रहर सेवा अखंड २४ तास सुरू ठेवण्यात आली होती. या सेवेत महिला आणि पुरुष सेवेकऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध व समर्पित सहभाग नोंदवत सेवाभावाची परंपरा जपली.
या सप्ताहात स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या अठरा विभागांमार्फत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. गर्भसंस्कार, बालसंस्कार, ध्यान, वास्तुशास्त्र, शेतीशास्त्र, मनाचे श्लोक, गीताई, गीतेचा पंधरावा अध्याय, हनुमान चालीसा, पसायदान, विष्णुसहस्रनाम पठण आणि स्वामी समर्थ मंत्रजप यांसारख्या उपक्रमांनी कार्यक्रम अधिक समृद्ध आणि ज्ञानवर्धक ठरला.
सांगता सोहळ्यात नित्य स्वाहाकार, बलिपूर्णाहुती, श्री सत्यदत्त पूजन आणि देवता विसर्जन विधी भक्तिभावाने पार पडले. यावेळी स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या कार्याचा सामाजिक आणि आध्यात्मिक प्रभाव अधोरेखित करण्यात आला. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्याचा तसेच दिंडोरी प्रणित सेवा मार्गाच्या कार्यपरंपरेचा सखोल आढावा घेण्यात आला.
“नामस्मरणाचे महत्त्व” अधोरेखित करताना नामजप, सेवा आणि नम्रतेमुळे जीवनात सकारात्मक बदल घडतात, असा संदेश देण्यात आला. धरणगावच्या नगराध्यक्ष लीला चौधरी यांनीही स्वामी सेवेमुळे त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात झालेल्या सकारात्मक परिवर्तनाचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला.
या यज्ञ सप्ताहामुळे सेवा, समर्पण, नैतिकता आणि श्रद्धेची मूल्ये समाजात अधिक दृढ झाली असून धरणगावातील हा उपक्रम एक आदर्श ठरला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवेकरी परिवाराचे योगदान मोलाचे ठरले. तसेच, श्री स्वामी सेवा मासिक अंकासाठी सभासद नोंदणी सुरू असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.



