जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रमुख नागरिक संघोष्टींचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमांद्वारे समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जळगाव, भुसावळ, चाळीसगाव आणि अमळनेर येथे होणाऱ्या या संघोष्टींमध्ये संघाचे अखिल भारतीय स्तरावरील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
या मालिकेतील पहिला कार्यक्रम १८ एप्रिल २०२६ रोजी भुसावळ येथे प्रभाकर हॉल, जळगाव रोड येथे सायंकाळी ४:३० वाजता होणार आहे. त्यानंतर १९ एप्रिल २०२६ रोजी जळगाव येथे भैयासाहेब गंधे बहुउद्देश्यीय सभागृहात सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेत संघोष्टी आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी डॉक्टर, इंजिनिअर, वकील, धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती, कृषी व सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, पर्यावरण प्रेमी, उद्योजक, व्यापारी तसेच अनुसूचित जाती-जमातीतील प्रतिनिधी, प्रिंट मिडिया संपादक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे.

या कार्यक्रमांना संघाकडून प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री रामलाल जी उपस्थित राहणार आहेत. ते वरिष्ठ प्रचारक असून त्यांनी यापूर्वी १३ वर्षे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय संघटन मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून समाजातील विविध घटकांमध्ये समन्वय साधण्यावर भर दिला जाणार आहे.
तसेच १९ एप्रिल २०२६ रोजीच चाळीसगाव येथे पाटीदार भवन, भडगाव रस्ता येथे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत आणखी एक संघोष्टी होणार आहे. या कार्यक्रमातही विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रीय विषयांवर चर्चा करणार आहेत. या माध्यमातून स्थानिक पातळीवर संवादाचे व्यासपीठ निर्माण करण्याचा उद्देश आहे.
या उपक्रमाचा समारोप २० एप्रिल २०२६ रोजी अमळनेर येथे होणाऱ्या संघोष्टीने होणार आहे. कै. काकासाहेब शंकरराव राणे सभागृह, प्रताप कॉलेज परिसरात सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अमळनेर, पारोळा, धरणगाव, एरंडोल तसेच आसपासच्या भागातील विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विशेषतः रिक्षा युनियन प्रतिनिधींसह सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील विविध घटकांची उपस्थिती या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप देणार आहे.
अमळनेर येथील कार्यक्रमासाठी संघाकडून मा. श्री सुनील जी आंबेकर हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. ते अखिल भारतीय प्रचार प्रमुख असून केंद्र भाग्यनगर (हैदराबाद) येथे कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी १२ वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी राष्ट्रीय संघटन मंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या अनुभवातून युवक आणि समाजातील विविध घटकांना दिशा देण्याचा प्रयत्न होणार आहे.



