आषाढी एकादशीनिमित्त मयुरेश्वर स्कूलमध्ये ‘पावले चालती पंढरीची वाट’ कार्यक्रमाने भक्तिमय वातावरण


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशीचा पावन दिन देशभर मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, रायपूर, कुसुम्बा येथे ‘पावले चालती पंढरीची वाट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन विठ्ठलभक्तीची परंपरा जिवंत ठेवली.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीहरी विठ्ठल-रुक्माई यांच्या मूर्तीचे, श्रीज्ञानेश्वरी ग्रंथाचे आणि पालखीचे पूजनाने झाली. हे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती परदेशी, सोनी दिसले मॅडम, मयुरी वाघ मॅडम, भावना परदेशी मॅडम यांच्या हस्ते पार पडले. या पूजनाच्या कार्यक्रमात सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.

यानंतर ‘पावले चालती पंढरीची वाट’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. श्री विठ्ठल-रुक्माई माऊलीची पालखी आणि श्रीज्ञानेश्वरी ग्रंथासह निघालेल्या दिंडीत, विद्यार्थ्यांनी श्रीविठ्ठल विठ्ठल या घोषणांनी परिसर भक्तिमय केला. या पालखी दिंडीने मयुरेश्वर स्कूलपासून श्रीसंत गजानन महाराज मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री दत्त मंदिर, कुसुम्बा पर्यंत यात्रा पूर्ण केली.

विद्यार्थ्यांनी ‘मी चाललो पंढरी’ या भक्तिगीतावर सादर केलेल्या गट नृत्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. श्रीहरी विठ्ठल वेशभूषेत चित्रास तायडे आणि रुक्माई वेशात महाश्वेता राणे यांनी साकारलेली भूमिकाही विशेष कौतुकास्पद ठरली. लहान मुलांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून एक सुंदर भक्तिरसपूर्ण वातावरण निर्माण केलं.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी, पालकवर्ग आणि ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या भक्तिपूर्ण कार्यक्रमामुळे मुलांमध्ये वारकरी संप्रदायाविषयी जाणीव निर्माण झाली तसेच ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडली गेली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण शिक्षकवर्ग, पालकवर्ग आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले. शाळेच्या वतीने या उपक्रमाचे कौतुक होत असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन नियमित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.