पंढरपुरात आषाढी एकादशीचा महासोहळा: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा


पंढरपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विठुरायाच्या जयघोषात आणि हरिनामाच्या गजरात दुमदुमून गेलेल्या पंढरपुरात आज आषाढी एकादशीचा महासोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या पवित्र दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची शासकीय महापूजा केली. त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिविजा देखील उपस्थित होत्या.

पहाटे ३ च्या सुमारास विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासह आणि या वर्षीचे मानाचे वारकरी ठरलेल्या नाशिकमधील उगले दाम्पत्यासह (कैलास आणि कल्पना उगले) रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी रुक्मिणी मातेच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्र्यांनी उगले दाम्पत्यासोबत पूजा केली. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

शेतकऱ्यांसाठी आणि राज्याच्या विकासासाठी साकडं:
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आज देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी पत्नी अमृता आणि कन्या दिविजा यांच्यासमवेत शासकीय महापूजा करण्याचे सौभाग्य लाभले. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले असून, विठुमाऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली.”

उगले दाम्पत्य मानाचे वारकरी:
महिनाभर पायी वारी करत पंढरी नगरीत दाखल झालेल्या वारकऱ्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील जातेगावचे कैलास उगले आणि कल्पना उगले हे दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी ठरले. मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते शाल आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन उगले दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दिंड्या आणि पालख्यांमुळे पंढरपूर नगरीला भक्तीमय स्वरूप प्राप्त झाले होते. “माऊली माऊली” आणि “ज्ञानबा तुकाराम” च्या गजरात वारकऱ्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. ८०० वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या या वारीच्या आनंद सोहळ्याने संपूर्ण पंढरपूरमध्ये चैतन्य संचारले होते.