शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगावमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. पंढरपूरला जाण्यास असमर्थ असलेले भाविक मोठ्या संख्येने श्री संत गजानन महाराज आणि विठुरायाच्या दर्शनासाठी शेगावात दाखल झाले आहेत. श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव हे स्वच्छता, सेवा आणि शिस्त या त्रिसूत्रीसाठी देशभरात ओळखले जाते.
भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी गेल्या २४ तासांपासून मंदिराचे दरवाजे खुले ठेवण्यात आले आहेत. शेकडो सेवेकरी कोणत्याही भाविकाला त्रास होऊ नये यासाठी अहोरात्र सेवा देत आहेत.
पालखी पंढरपूरला दाखल:
दरम्यान, श्री क्षेत्र शेगाव येथून निघालेली श्री संत गजानन महाराज यांची पालखी ४ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचली आहे. तब्बल ३३ दिवसांत नऊ जिल्ह्यांमधून सुमारे ७५० किलोमीटरचा पायी प्रवास करत हजारो वारकरी आषाढी एकादशी उत्सवात सहभागी होण्यासाठी पंढरपूरला पोहोचले आहेत. श्रींची यंदाची ही ५६ वी पालखी असून, या पालखीत ८०० वारकरी सहभागी झाले आहेत. “ज्ञानोबा माऊली तुकाराम, राम कृष्ण हरी, गण गण गणात बोते” च्या गजरात निघालेली ही पालखी आता पंढरपुरात दाखल झाली असून, पुढील पाच दिवस ती पंढरपूर येथे मुक्काम करेल आणि ३१ जुलै रोजी पुन्हा शेगावमध्ये परत येईल.
भाविकांसाठी विशेष सोयी:
राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसोबत लहान बाळे आणि अबालवृद्धांसाठी श्री संस्थानच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना थेट रांगेत न लागता श्रींच्या भुयार दर्शनापर्यंत विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या श्रींच्या दर्शनासाठी तीन तासांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत असली तरी, भाविक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततेत “गण गण गणात बोते” आणि “जय हरी विठ्ठल” चा नामघोष करत दर्शन घेत आहेत.
महाप्रसाद आणि अध्यात्मिक कार्यक्रम:
आज एकादशीनिमित्त श्री संस्थानच्या वतीने भाविकांसाठी दिवसभर मोफत फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, दिवसभर कीर्तन, प्रवचन, श्रींच्या रजत मुखवट्याची परिक्रमा यांसारखे विविध अध्यात्मिक उपक्रम नित्यनियमाने पार पडत आहेत, ज्यात राज्यभरातून आलेले भाविक मोठ्या संख्येने आपली सेवा अर्पण करत आहेत.