
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या भावनेतून संत निरंकारी मिशनच्या वतीने अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 53 निरंकारी भक्तांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह जी यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सेवा उपक्रमांचा हा एक महत्त्वपूर्ण भाग होता.

युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह जी यांच्या स्मृतीत वर्षभर विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याच अंतर्गत देशभरातील सुमारे 705 ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या उपक्रमामागे मानवता, करुणा आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा उद्देश आहे. संत निरंकारी मिशनची रक्तदानाची परंपरा गेल्या चार दशकांपासून सातत्याने सुरू आहे. आतापर्यंत 9 हजार 174 रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून सुमारे 15 लाख 230 युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. या माध्यमातून निरंकारी मिशनची मानवसेवेप्रती असलेली कटिबद्धता अधोरेखित होत आहे.
अमळनेर येथे 14 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या पार्श्वभूमीवर 13 जून रोजी शहरात मोटरसायकल रॅली काढून रक्तदानाबाबत जनजागृती करण्यात आली होती. रविवार रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत संत निरंकारी सत्संग भवन, सिंधी कॉलनी, चोपडा रोड, अमळनेर येथे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात रक्तकेंद्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धुळे येथील अनुभवी डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदात्यांची आरोग्य तपासणी करून सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने रक्तदान प्रक्रिया पूर्ण केली. रक्त संकलनाच्या संपूर्ण प्रक्रियेत स्वच्छता, सुरक्षितता आणि सेवाभावाला विशेष महत्त्व देण्यात आले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन धुळे झोन 36 बी चे झोनल इंचार्ज आ. म. हिरालाल पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी अमळनेर ब्रँचचे प्रमुख आ. श्रीचंद निरंकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह जी यांनी सत्य, साधेपणा आणि सद्भावनेचा मार्ग दाखवत तरुणांना नशामुक्त जीवन जगण्याचे तसेच समाजसेवेसाठी आपली ऊर्जा वापरण्याचे आवाहन केले होते. बाबा हरदेव सिंह यांनी “रक्त नाड्यांतून वाहावे, नाल्यांतून नव्हे” हा मानवतेचा संदेश दिला. हाच सेवाभाव सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आजही प्रभावीपणे पुढे नेला जात आहे.
रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. रक्तदात्यांना अल्पोपहार, चहा, बिस्कीट, फळफळावळ तसेच प्रशस्तीपत्र देण्यात आले. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार असल्याने सहभागी रक्तदात्यांनी समाधान व्यक्त केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अमळनेर ब्रँच सेवादल इंचार्ज जितेंद्र डिंगराई, महिला इंचार्ज बहन प्रीती बटेजा यांच्यासह अमळनेर सेवादल सदस्य आणि साध संगत यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या नियोजनामुळे रक्तदान शिबिर सुरळीत आणि यशस्वीपणे पार पडले.



