Home Cities जळगाव कंत्राटी पद्धत बंद करून सफाई कामगारांची कायमस्वरूपी पदे भरा ; शासनाकडे मागणी

कंत्राटी पद्धत बंद करून सफाई कामगारांची कायमस्वरूपी पदे भरा ; शासनाकडे मागणी

0
4


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेची जिल्हास्तरीय बैठक तसेच जिल्हा व शहर कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती सोहळा जळगाव येथे उत्साहात पार पडला. या बैठकीत राज्यातील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी या मागण्या मान्य करून सफाई कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आली आहे.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुभाष पवार होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिलीप अण्णा चांगरे, प्रदेश सचिव रघुनाथ मोरे, प्रदेश सल्लागार मनोहर चावरे, प्रदेश सदस्य संजय सनकत, प्रदेश संघटन मंत्री विकास जाधव, प्रदेश सल्लागार अनिल तळलेले तसेच काँग्रेस सदस्य सुरेश भाई यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी पुढील दिशा निश्चित करण्यात आली. राज्यातील स्वच्छता व्यवस्थेमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कामगारांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा यासाठी कंत्राटी पद्धत आणि ‘मुक्तहरी’ पद्धत पूर्णपणे बंद करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. राज्यातील स्वच्छता विभागातील रिक्त असलेली सुमारे १ लाख पदे कायमस्वरूपी भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात यावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे. सफाई कामगारांना सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.

सफाई कामगारांच्या हितासाठी असलेल्या लाड-पागे समितीच्या शिफारशी राज्यातील सर्व शासकीय विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभावीपणे लागू करण्यात याव्यात, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या शिफारशींची अंमलबजावणी झाल्यास सफाई कामगारांच्या अनेक समस्या मार्गी लागतील, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. याशिवाय मेहतर, वाल्मिकी आणि सुदर्शन समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. शासनाने विविध समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन केली आहेत, त्याच धर्तीवर या समाजासाठीही स्वतंत्र महामंडळ निर्माण करून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे, अशी भूमिका संघटनेने मांडली.

बैठकीच्या निमित्ताने अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या जिल्हा आणि शहर कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सफाई कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने कार्यरत राहण्याची आणि संघटना अधिक मजबूत करण्याची शपथ घेतली. या जिल्हास्तरीय बैठकीला जळगाव जिल्ह्यातील तसेच शहरातील मोठ्या संख्येने सफाई कामगार, संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सफाई कामगारांच्या प्रश्नांना शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आगामी काळात आंदोलनात्मक तसेच संघटनात्मक पातळीवर प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.


Protected Content

Play sound