Home क्राईम शिरसोली घरफोडीचा गुन्हा उघड ; तीन आरोपी ताब्यात, ६ लाख ६८ हजारांचा...

शिरसोली घरफोडीचा गुन्हा उघड ; तीन आरोपी ताब्यात, ६ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त

0
4

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरसोली प्र.बो. येथे झालेल्या घरफोडी चोरीचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला असून, या प्रकरणात तीन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा एकूण ६ लाख ६८ हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत ही कारवाई केली.

शिरसोली प्र.बो. येथील रहिवासी राजेंद्र दौलत आंबटकर हे ३० एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ वाजेपासून ५ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत बाहेरगावी गेले होते. ते घरी परतल्यानंतर त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला असल्याचे निदर्शनास आले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्यासह चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि अंमलदारांचे विशेष पथक तयार केले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून विविध माहिती संकलित केली. त्यानंतर तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींबाबत महत्त्वाची माहिती मिळवण्यात आली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुन्ना शहा सुलतान शहा (वय २२, रा. ढोलकपूर पोलीस चौकी, बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) याला बुऱ्हाणपूर येथून ताब्यात घेतले. मुस्तकीन उर्फ जुनेद भिकन शहा (वय २३, रा. बिस्मिल्ला चौकी, तांबापुरा, जळगाव, ह.मु. शिरसोली) याला बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी धाड येथून ताब्यात घेण्यात आले. तर जाबीर शहा जावेद शहा (वय २०, रा. मुस्लिम कॉलनी, बडी खानजवळ, भुसावळ) याला भुसावळ येथून ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी मुस्तकीन उर्फ जुनेद भिकन शहा हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी रामानंद, पारोळा आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या आरोपींच्या पूर्वीच्या गुन्हेगारी हालचालींचाही तपास केला जात आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. यामध्ये १० हजार रुपये रोख, ३ लाख ६० हजार ७९० रुपये किमतीची २६.७८० ग्रॅम वजनाची सोन्याची फॅन्सी शॉटपो, ३८ हजार रुपये किमतीच्या २.७८० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन फॅन्सी कानातील रिंग, ७० हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र, १ लाख ४० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची गळ्यातील चैन तसेच ५० हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची सीबीझेड मोटारसायकल यांचा समावेश आहे.

अशाप्रकारे पोलिसांनी एकूण ६ लाख ६८ हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी जळगाव जिल्ह्यातील किंवा इतर ठिकाणी आणखी काही गुन्हे केले आहेत का, याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही. त्या अनुषंगाने एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत साळुंखे, नितीन ठाकुर, गणेश ठाकरे, शशिकांत मराठे आणि योगेश घुगे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांच्या तपास कौशल्याच्या आधारे शिरसोली येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून तब्बल ६ लाख ६८ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला असून, आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound