Home आरोग्य किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बंद; दुरुस्ती बिल रखडल्याने रुग्णांचे हाल

किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बंद; दुरुस्ती बिल रखडल्याने रुग्णांचे हाल


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका गेल्या दीड महिन्यांपासून उपलब्ध नसल्याने परिसरातील रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुरुस्ती पूर्ण होऊनही बिल प्रलंबित असल्याने रुग्णवाहिका परत मिळत नसल्याचे समोर आले आहे.

किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एम.एच.१९ एम.९२९१ क्रमांकाची १०२ रुग्णवाहिका २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुरुस्तीसाठी जळगाव येथे पाठवण्यात आली होती. ही रुग्णवाहिका ६ मार्च रोजी दुरुस्त झाली असून, त्याचे २१ हजार ३२७ रुपयांचे बिल त्याच दिवशी जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आले आहे. मात्र, हे बिल अद्यापही प्रलंबित असल्याने रुग्णवाहिका केंद्रात परत उपलब्ध झालेली नाही.

रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे किनगाव व परिसरातील रुग्णांना उपचारासाठी इतर साधनांचा आधार घ्यावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत वेळेत उपचार मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत असून, यामुळे रुग्ण व आरोग्य केंद्रातील कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये वादही निर्माण होत असल्याची माहिती मिळत आहे.

स्थानिक नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून दुरुस्तीचे बिल मंजूर करावे आणि रुग्णवाहिका लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. आरोग्य सुविधांचा प्रश्न गंभीर होत चालल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, मार्च महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून आरोग्य विभागाचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे रुग्णवाहिका दुरुस्तीचे बिल देण्यास विलंब होत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत संबंधित वेबसाईट सुरू होईल आणि त्यानंतर त्वरित बिल अदा करून रुग्णवाहिका किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.


Protected Content

Play sound