जखमी प्रवाशांची आ. जावळेंनी घेतली भेट; संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी !


रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ रस्त्यावरील आमोदा गावाजवळ इंदूरहून जळगावकडे येणाऱ्या प्रवाशांनी भरलेल्या श्री गणेश लक्झरी खासगी बसचा आज भीषण अपघात होऊन ती पुलाखाली कोसळली. अपघाताची माहिती मिळताच आ.अमोल जावळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्त बसची पाहणी केली आणि जखमी प्रवाशांची विचारपूस करून त्यांना धीर दिला. गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याने आमदार जावळे यांनी या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेतली.

यावेळी आमदार जावळे यांनी सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) अभियंता विश्वानंद तायडे यांना घटनास्थळी बोलावून घेतले. या रस्त्यावर वारंवार अपघात का होतात, याची सविस्तर माहिती त्यांनी तायडे यांच्याकडून घेतली. रस्त्याच्या रचनेतील तांत्रिक त्रुटी, चुकीचे वळण, साईन बोर्ड व रिफ्लेक्टरची कमतरता, तसेच आवश्यक सुरक्षात्मक कठड्यांचा अभाव यांसारख्या अनेक पैलूंचा त्यांनी सर्वांगीण आढावा घेतला.

या गंभीर परिस्थितीवर आमदार जावळे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या. ज्या तांत्रिक कारणांमुळे हे अपघात घडत आहेत, त्यावर पुढील आठ दिवसांत ठोस उपाययोजना करून रस्त्याची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे त्यांनी बजावले. “अन्यथा याप्रकरणी गाठ माझ्याशी आहे,” असा सज्जड इशाराही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. या मार्गावरून दररोज अनेक प्रवासी ये-जा करत असल्याने भविष्यात अशा दुर्घटना टाळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.