जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कॉपर तारांचे भंगार देण्याचा बहाणा करून आंध्रप्रदेशातील एका व्यापाऱ्याला जळगाव तालुक्यातील भादली गावात बोलवून ५ जणांनी बेदम मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. या संदर्भात मंगळवारी १० डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अनोळखी पाच हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दुर्गावेंकटेशराव सूर्यनारायण काटाकोटा वय-४१, रा. भेदा पांडू मंडल, वेस्ट गोदावरी राज्य आंध्र प्रदेश हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कॉपर तारांचे भंगार खरेदी विक्रीचे व्यवसाय करत आपला उदरनिर्वाह करतात.
गेल्या आठवड्यात त्यांना एका व्हाट्सअपवरून कॉपरचे भंगार विक्री असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी जळगाव तालुक्यातील भादली गावातील एकाशी मोबाईलवरती फोन करून माहिती दिली. त्यानुसार मोबाईलधारकाने कॉपर तारांचे भंगार असलेला फोटो पाठवले. त्यानुसार व्यापारी दुर्गावेंकटेशराव काटाकोटा यांनी भंगार पाहिले, त्यानंतर त्यांनी मोबाईलधारकाला लोकेशन टाकण्याचे सांगितले. त्यालोकेशन नुसार ते जळगावला येण्यासाठी निघाले. सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता व्यापारी जळगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाले. आणि रिक्षाने भादली गावातील चहाच्या टपरीवर थांबले. तेथूनच व्यापाऱ्याने मोबाईलधारकाला फोन लावला,त्यानुसार मोबाईलधारकाने चहा टपरीवाल्याशी फोनवर बोलणं केले. त्यानुसार चहा टपरीवाल्याने व्यापाऱ्याला दुचाकीवर बसवून गावाच्या बाहेर असलेल्या पाठचारी जवळील पंप हाऊस येथे नेले. चहा टपरीवाल्यासह इतर अनोळखी ४ जणांनी व्यापाऱ्याला पकडून मारहाण करून त्यांच्याजवळ सोन्याची साखळी, मोबाईल जबरदस्ती हिसकावला, त्यानंतर व्यापाऱ्याच्या फोन-पे वरून ५० हजार आणि ४० हजार असे एकुण ९० हजार रुपये ऑनलाईन बळजबरीने ट्रान्सफर करून घेतले आणि पसार झाले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर व्यापाऱ्याने आपल्या मुंबई येथील त्यांच्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानुसार त्यांचा भाऊ जळगाव दाखल झाला. त्यानुसार मंगळवारी १० डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात ५ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.