मास्टर कॉलनीत घरफोडी करणारे तिघे जेरबंद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मास्टर कॉलनी येथे बंद घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना बुधवार ३ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता मास्टर कॉलनी आणि तांबापुरा परिसरातून अटक केली आहे. तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मास्टर कॉलनी येथे जाणारे मेहरुन्नीसा शेख नियाजोद्दीन (वय-५६) रा. जमजम किराणानगर जवळ, मास्टर कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. २८ जुलै रोजी सकाळी त्यांचा मुलगा आणि सून हे कामाच्या निमित्ताने नगरदेवळा गावाला गेले होते. त्यामुळे मेहरुन्नीसा ह्या शेजारी राहणाऱ्या पुतण्याकडे रात्री झोपण्यासाठी गेल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत बंद घर फोडून घरातील २० हजार रुपयांची रोकड, सोन्याचे कानातील टॉप्स, सोन्याचे मंगळपोत असा एकूण ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. या संदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे तांबापुर आणि मास्टर कॉलनीत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पोलीस नाईक, सुधीर सावळे, इमरान सैय्यद, मुदस्सर काझी, जमीर शेख, सचिन पाटील, साईनाथ मुंडे यांनी कारवाई करत इश्तीयाक अली राजीक अली (वय-१९), सलीम उर्फ सल्या शेख कय्यूब (वय-२६) दोन्ही रा. तांबापुरा आणि सरजील सैय्यद हरून सैय्यद (वय-२६) रा. मास्टर कॉलनी, जळगाव तीन जणांना अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील आणि पो.ना. सचिन पाटील करीत आहे.

 

Protected Content