नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे- पालकमंत्र्यांचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । जळगावात कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आलेला रूग्ण आढळून आला तरी जनतेने घाबरून न जाता प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

आज सायंकाळी मेहरूण परिसरातील एका ४९ वर्षे वय असणार्‍या नागरिकाची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेला घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग जगभर थैमान घालत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी देशभर लॉकडाऊन केला आहे. राज्यात या विषाणूचा संसर्ग वाढू नये. याकरिता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे विविध महत्वपूर्ण निर्णय घेत आहे. तर जिल्हा प्रशासन आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी या निर्णयांची अंमलबजावणी करीत आहे. याचा परिणाम म्हणून अद्यापपर्यंत आपल्या जिल्ह्यात एकही रूग्ण आढळून आलेला नव्हता. परंतु आज एक रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे आता आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करणे हेच आपल्या हिताचे आहे.

हे देखील वाचा : शॉकींग : जळगावात आढळला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण

या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, मी पालकमंत्री या नात्याने सर्व जिल्हावासियांना ग्वाही देतो की, आपणास जीवनावश्यक वस्तूंची कुठलीही कमतरता पडणार नाही. यामुळे घाबरू नका ….. पण जागरूक रहा. लॉकडाऊन संपेपर्यंत घराबाहेर पडू नका. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. अनावश्यक प्रवास टाळा. प्रशासन आपल्या सुरक्षेसाठी आहे. आपण सहकार्य करा. नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन ना. पाटील यांनी केले आहे.

हे देखील वाचा : कोरोनाची एंट्री : आता जळगावकरांची खरी परीक्षा !

Protected Content