जळगाव प्रतिनिधी । प्रशासनाने खूप प्रयत्न करूनही संचारबंदीचा फज्जा उडविणार्या जळगावकरांना कोरोनाचा एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने धक्का बसला आहे. आता यापुढे तरी सोशल डिस्टन्सींग पाळले नाही तर परिस्थिती चिघळण्याचा धोका असून नागरिकांनी संचारबंदीला गांभिर्याने घेण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
आज रात्री आठच्या सुमारास काल सँपल पाठविलेल्या एका रूग्णाचा कोव्हीड-१९ या विषाणूच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. पहिल्यांदा केंद्र सरकारने एक दिवसाचा जनता कर्फ्यू लावल्यानंतर राज्य सरकारने ३१ तारखेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला. यानंतर केंद्र सरकारने तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यात संचारबंदीच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये बर्यापैकी प्रतिसाद लाभला. पोलीस प्रशासनाने अतिशय सक्तीने नागरिकांना घरात बसण्यासाठी बाध्य केले. मात्र संचारबंदीत बर्यापैकी शैथिल्या आल्याचे दिसून येत आहे. यात आज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भाजी बाजाराच्या लिलावाच्या प्रसंगी तर हजारो लोक कोणत्याही प्रकारची काळजी न घेता अगदी बिनदिक्कतपणे बाजारात फिरत असल्याचे दिसून आले. आम्ही लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून याचे लाईव्ह प्रक्षेपण करून ही बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. जिल्हाधिकार्यांनी याची दखल घेत सायंकाळच्या बैठकीत व्यापार्यांना सक्त सूचना दिल्या. यानंतर रात्री पहिला रूग्ण आढळून आल्याचे वृत्त आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
दरम्यान, कोरोना हा आजार बरा होणारा असल्याने याला फार घाबरण्याची आवश्यकता नाही. तथापि, याच्या प्रसाराचा वेग हा खूप जास्त असून एकाच वेळी अनेक रूग्ण गंभीर झाल्यास भयंकर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. संबंधीत रूग्ण हा जळगावातल्या मेहरूणमधील असून तो अलीकडेच विदेशातून आला होता. आता तो त्याच्या कुटुंबासह नेमक्या किती जणांच्या संपर्कात आला ? यावरून बरेच काही ठरणार आहे. या सर्वांना किमान होम क्वॉरंटाईन करावे लागणार आहे. तसेच आता पहिला रूग्ण आढळून आल्याने शहरासह जिल्ह्यात याची साथ पसरण्याचा धोकादेखील निर्माण झाला असून नागरिकांनी संचारबंदीला आता गांभिर्याने घेण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
हे वृत्तदेखील वाचा : शॉकींग : जळगावात आढळला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण