
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मेहरून येथील स्मशानभूमीतून सोन्याच्या लालसेपोटी अज्ञात चोरट्यांनी एका वृद्ध महिलेच्या अस्थींची चोरी केली आहे. ही बातमी समोर येताच शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गायत्री नगर येथील रहिवासी छबाबाई काशिनाथ पाटील यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने अंतिम संस्कारापूर्वी काढण्यात आले नव्हते. याच गोष्टीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री स्मशानभूमीतून त्यांच्या अस्थी चोरून नेल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघड झाला.
चोरट्यांनी विशेषतः छबाबाई पाटील यांच्या डोक्याच्या, हाताच्या आणि पायाच्या अस्थी चोरल्या आहेत. अस्थींवर शिल्लक राहिलेले सोन्याचे दागिने मिळवण्यासाठीच अस्थी चोरण्यात आल्याचा पाटील परिवाराचा स्पष्ट आरोप आहे.
या घटनेमुळे पाटील कुटुंबीयांनी महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर आणि स्मशानभूमीतील सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी बोलताना आमदार सुरेश भोळे यांनीही महापालिकेच्या सुरक्षेवर ताशेरे ओढले. “ज्या शहरात मेलेल्या नागरिकांची अस्थी देखील सुरक्षित नाही, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, पाटील कुटुंबाने अत्यंत भावनिक आवाहन केले आहे. “आम्हाला सोनं नको, फक्त आमच्या आईच्या अस्थी परत करा,” अशी हृदयद्रावक मागणी त्यांनी केली आहे. सदर प्रकरणी अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला तरी, या संतापजनक कृत्याचा तपास करून चोरट्यांना शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी स्मशानभूमीमध्ये तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.



