
मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे 1300 किलो भंगार कोणतीही निविदा न काढता गुपचूप विकण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. यामुळे विभागाच्या कारभारावर, विशेषतः पारदर्शकता आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शासकीय संपत्तीच्या व्यवस्थापनातील हा प्रकार केवळ नियमभंग नसून संभाव्य भ्रष्टाचाराच्या दिशेने लक्ष वेधणारा ठरतो.
सरकारी नियमांनुसार कोणतीही भंगार वस्तू विक्रीसाठी नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवली पाहिजे, तसेच संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी स्थानिक व प्रादेशिक वृत्तपत्रांत करणे बंधनकारक असते. मात्र, या प्रकरणात ना निविदा प्रक्रिया पार पडली, ना कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे ही विक्री कोणत्या आधारावर आणि कुणाच्या परवानगीने करण्यात आली, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पत्रकारांनी या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात चौकशी केली असता, कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. कर्मचारी मात्र 1300 किलो भंगार विकल्याची माहिती देत होते. मात्र भंगाराचे नेमके वजन किती होते, त्याचा दर काय होता, पावती कुठे आहे आणि ती कोणाच्या नावावर फाडण्यात आली, याविषयी कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे ही संपूर्ण विक्री प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात तीव्र संताप व्यक्त करत, यामागे आर्थिक अपारदर्शकता व भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर जनतेत विभागाविषयी नाराजी वाढली असून, शासनाच्या संपत्तीचे असे गैरव्यवस्थापन सहन केले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी बेंडकुळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी “मला या प्रकरणाची माहिती नाही, माहिती घेऊन सांगतो” असे उडवाउडवीची उत्तर दिली. अधिकाऱ्यांच्या अशा असमर्थ जबाबांमुळे नागरिकांच्या मनात संभ्रम अधिकच वाढला आहे. भंगार कर्मचारी स्वतःहून विक्री करू शकत नाहीत, तर त्यामागे वरिष्ठांची संमती होती का, हा मुख्य मुद्दा बनला आहे.



