
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्ताने जळगाव शहरात मंगळवारी, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत महर्षी वाल्मिकी यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता जळगाव शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता शहरातील वाल्मिकीनगर येथे झाली. मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करण्यात आले, तसेच त्यांची आरती करण्यात आली. याप्रसंगी समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. यानंतर, समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याबरोबरच, मानवतावादी दृष्टिकोन ठेवून भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते, ज्याला समाजबांधवांकडून उदंड प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमित सोळुंखे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, माजी नगरसेवक किशोर बाविस्कर व कैलास सोनवणे, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, सामाजिक सेविका मंगला सोनवणे, मंदा सोनवणे आणि रूपाली वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सायंकाळी ६ वाजता महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक आणि आधुनिक संगीताच्या तालावर समाजबांधवांनी मोठ्या उत्साहाने नृत्याचा ठेका धरला. मिरवणुकीत समाजबांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते, ज्यामुळे संपूर्ण शहरात एक उत्साहाचे आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. महर्षी वाल्मिकींच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आणि समाजाला प्रगतीच्या दिशेने नेण्याचा संकल्प या निमित्ताने करण्यात आला.



