ब्रेकींग : वृद्ध महिलेवर भरदिवसा कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला !


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील जवाहर रोडवरील श्रीराम मंदिराजवळ गुरुवारी (२६ जून) दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास एका वृद्ध महिलेवर भरदिवसा घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात लिलाबाई रघुनाथ विसपुते (वय ७३) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

गुरुवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास ही घटना घडली. लिलाबाई विसपुते या काही दिवसांसाठी आपल्या मुलीकडे धरणगावी आल्या होत्या. घटनेच्या वेळी त्या खोलीत विश्रांती घेत होत्या. त्याचवेळी एका अज्ञात हल्लेखोराने मागच्या दरवाजातून घरात प्रवेश केला आणि त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने आठ ते नऊ वार केले. या हल्ल्यात त्यांचा डावा हातही गंभीर जखमी झाला असून, एक बोट तुटले आहे.

हल्ला होत असताना कुटुंबातील इतर सदस्य हॉलमध्ये होते. लिलाबाईंचा नातू तेजस पोतदार याने घरात प्रवेश करताना मागच्या दरवाजातून एक व्यक्ती पळून जाताना पाहिले आणि त्याने त्याचा पाठलागही केला. मात्र, तो हल्लेखोर फरार होण्यात यशस्वी झाला.

लिलाबाईंना तातडीने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथे हलवण्यात आले. विशेष बाब म्हणजे, घरातून कोणतीही वस्तू किंवा दागिने चोरीला गेलेले नाहीत. त्यामुळे या हल्ल्यामागे नेमके काय कारण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. भरदिवसा, घरात घुसून करण्यात आलेल्या या हिंसक हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोर कोण होता आणि या हल्ल्यामागचा उद्देश काय होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.