पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील व्यंकटेश नगर परिसरातील रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामांवरून जनसेवक पी.जी. पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पूर्वी काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत सोडून रस्त्याची दुर्दशा केल्याने, ठेकेदार आणि प्रशासनाच्या विरोधात त्यांनी ताशेरे ओढले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असताना रस्त्याची अशी अवस्था केल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वेंकटेश नगर परिसरातील काँक्रिटीकरण केलेला रस्ता दुरुस्त करण्याच्या नावाखाली फोडण्यात आला आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे. या चिखलातून रिक्षा किंवा दुचाकी वाहने जाणे धोकादायक बनले आहे. रिक्षा पलटी होऊन विद्यार्थ्यांना दुखापत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, नागरिकांना ये-जा करण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे. केवळ वेंकटेश नगरच नाही, तर पारोळा शहरातील अनेक गल्ली-बोळात अशाच प्रकारे अर्धवट कामे करून नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचे पी.जी. पाटील यांनी म्हटले आहे.
ठेकेदार केवळ आपले बिल काढण्यासाठी मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोप पी.जी. पाटील यांनी केला आहे. ते म्हणाले की, ठेकेदार ४० टक्के काम करून ९० टक्के बिलाची वसुली करत आहेत, आणि यावर प्रशासनाचा कोणताही वचक राहिलेला नाही. प्रशासकीय अधिकारी ठेकेदारांवर नियंत्रण ठेवू शकत नसतील, तर त्यांनी आपल्या बदल्या करून घ्याव्यात, जेणेकरून नवीन अधिकारी चांगल्या रीतीने काम करतील, अशी मागणीही त्यांनी केली.
पी.जी. पाटील यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, त्यांनी नागरिकांचा विचार करून ही रस्त्यांची कामे तात्काळ थांबवावीत आणि पावसाळ्यानंतर कामांना सुरुवात करावी. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.