घरगुती वादातून तरुणाला बेदम मारहाण; तोंडावर धारदार शस्त्राने वार !


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील इस्लामपुरा भागात मंगळवारी (२४ जून) रात्री १० वाजता घरगुती वादातून एका ३५ वर्षीय तरुणाला चार जणांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत एकाने धारदार शस्त्राने तरुणाच्या तोंडावर वार करून त्याला जखमी केले. या प्रकरणी गुरुवारी (२६ जून) दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामपुरा येथे राहणारा वसीम शरीफ शहा (वय ३५) हा तरुण २४ जून रोजी रात्री आपल्या कुटुंबासह घरी असताना, घरगुती वादातून हा प्रकार घडला. गुजरातच्या सुरत येथील अफसर शहा, इस्लामपुरा येथील हसरत जहा शरीफ शहा आणि अफरोज शरीफ शहा, तसेच एक अनोळखी व्यक्ती अशा चार जणांनी मिळून वसीम शहाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर एकाने धारदार शस्त्राने वसीमच्या तोंडावर वार करून त्याला जखमी केले.

या घटनेनंतर वसीम शहा यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विनोद सोनवणे करत आहेत. घरगुती वादातून झालेल्या या गंभीर मारहाणीमुळे परिसरात चिंता व्यक्त होत आहे.