धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नातवाला फोनवरून शिवीगाळ का करतो, याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका वृद्ध व्यक्तीला आणि त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण करून डोक्यात वीट फेकल्याची धक्कादायक घटना बुधवार, २५ जून रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे घडली आहे. या प्रकरणी गुरुवारी २६ जून रोजी रात्री १० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांभोरी येथील प्रकाश सुखदेव कोळी (वय ६७) हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचा नातू रवी सोनवणे याला पंकज दिनकर सोनवणे हा विनाकारण फोनवरून शिवीगाळ करत होता. याच संदर्भात प्रकाश कोळी यांनी २५ जून रोजी सायंकाळी ७ वाजता पंकज सोनवणेला शिवीगाळ करण्यामागचे कारण विचारले. यावरून पंकजला राग आला.
रागाच्या भरात पंकज दिनकर सोनवणे, कल्पनाबाई दिनकर सोनवणे, रुपाली कोळी आणि आशाबाई कोळी (सर्व रा. बांभोरी, ता. धरणगाव) यांनी मिळून प्रकाश कोळी आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. एवढेच नाही, तर त्यांनी रस्त्यावरील वीट उचलून प्रकाश कोळी यांच्या डोक्यात फेकून मारली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. या झटापटीत प्रकाश कोळी यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटून नुकसानही झाले.
या घटनेनंतर प्रकाश कोळी यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पंकज दिनकर सोनवणे, कल्पनाबाई दिनकर सोनवणे, रुपाली कोळी आणि आशाबाई कोळी या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण तांदळे करीत आहेत.