बसस्थानकात मोबाईल चोरांचा सुळसुळाट; तीन प्रवाशांना फटका !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरात गुरुवारी, २६ जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एकाच वेळी तीन प्रवाशांचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सायंकाळी ७ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसस्थानकात वाढलेल्या मोबाईल चोऱ्यांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या नवीन बसस्थानकात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी काही केशकर्तनांना अटक केली होती. मात्र, आता पुन्हा गुरुवारी दुपारी दीड वाजता धामणगाव येथील प्रतीक महेंद्र सपकाळे (वय २४), यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील गौरव ज्ञानेश्वर कोळी, आणि सोयगाव तालुक्यातील मुखेड येथील रोहित कांतीलाल रेस्वाल या तीन प्रवाशांचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरले.

या घटनेनंतर प्रतीक सपकाळे यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेश सोनवणे करत आहेत. बसस्थानकातील वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी अधिक कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.