जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जून २०२६ पासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्राच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांसाठी शालेय वाहनांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीस प्राधान्य देत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) सर्व स्कूलबस आणि व्हॅनची कागदपत्रे तपासणे अनिवार्य केले असून, ३१ मेपूर्वी सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरटीओकडून जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, शाळा व्यवस्थापनांनी त्यांच्या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची प्रत्यक्ष तपासणी करणे आवश्यक राहणार आहे. वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस), परवाना, विमा, पीयूसी प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रे वैध असल्याची खात्री करूनच संबंधित वाहनांना विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची परवानगी देण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

शाळा व्यवस्थापनांनी संबंधित वाहनचालक आणि वाहनमालकांना अपूर्ण किंवा मुदत संपलेल्या कागदपत्रांची तातडीने पूर्तता करण्याच्या सूचना द्याव्यात, असेही सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित आणि अपघातमुक्त व्हावी, यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांनी अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नमूद केले आहे.
तपासणीदरम्यान एखाद्या वाहनाची कागदपत्रे अपूर्ण किंवा अवैध आढळल्यास संबंधित वाहन जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय ही संबंधित शाळा व्यवस्थापन आणि वाहनधारकांची जबाबदारी राहील, असा इशाराही आरटीओने दिला आहे. त्यामुळे शाळा प्रशासनाने वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व परवानाधारक स्कूलबस, व्हॅन वाहनधारक आणि चालकांनी वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरण, वाहनकर भरणा आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता ३१ मे २०२६ पूर्वी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विशेष अतिरिक्त अपॉइंटमेंट सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी दिली.



