अमळनेरमधून १६ चाकी डंपरची धाडसी चोरी !


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। अमळनेर शहरात गुरुवारी (२६ जून) सकाळी ६ वाजताच्या सुमारास धुळे रोडवरील अनुसया पेट्रोल पंपाजवळून एक १६ चाकी मोठा डंपर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरुण पुंडलिक पाटील यांच्या मालकीचा (एमएच ४६ बीपी ७४१३) क्रमांकाचा १६ चाकी डंपर अनुसया पेट्रोल पंपाजवळ पार्किंगला लावला होता. गुरुवारी सकाळी ६ वाजता डंपर जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. डंपर चोरीला गेल्याचे लक्षात येताच मालक अरुण पाटील यांनी परिसरात आणि इतर ठिकाणी त्याचा शोध घेतला. मात्र, डंपरचा काहीही थांगपत्ता लागला नाही.

अखेरीस, अरुण पाटील यांचे नातेवाईक योगेश पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार, सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अमळनेर शहरातून थेट १६ चाकी डंपर चोरीला गेल्याने शहराच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.