भाजपा म्हणजे विकासाच्या झारीतील कमळाचार्य – सचिन सावंत

मुंबई । भाजपा म्हणजे महाराष्ट्र विकासाच्या झारीतील कमळाचार्य आहे. या कमळाचार्याचा महाराष्ट्राच्या हितावर असलेला तिरका डोळा जनतेनेच फोडावा. मविआ सरकारच्या राज्य हिताच्या निर्णयांत भाजपा व मोदी सरकार सातत्याने अडथळे आणण्याचा प्रयत्न करते, असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

आरेला पर्याय म्हणून मेट्रो कारशेडसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राने दावा केला आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडच्या जागेवरून आता केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीतील नेत्यांकडून भाजपावर निशाणा साधला जात आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील याच मुद्यावरून भाजपावर टीका केली आहे.

”भाजपा म्हणजे महाराष्ट्र विकासाच्या झारीतील कमळाचार्य आहे. या कमळाचार्याचा महाराष्ट्राच्या हितावर असलेला तिरका डोळा जनतेनेच फोडावा. मविआ सरकारच्या राज्य हिताच्या निर्णयांत भाजपा व मोदी सरकार सातत्याने अडथळे आणण्याचा प्रयत्न करते. कांजूरमार्गची मेट्रो कारशेडची जमीन ही राज्याची आहे.” असं सावंत यांनी म्हटलं आहे.

या अगोदर  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील या मुद्यावरून भाजपावर टीका केली आहे. कांजूरमार्ग कारशेड हा मुंबईच्या दोन लाईनला जोडणारा प्रकल्प असून २० लाख लोकांना त्याचा फायदा मिळवून देणारा असल्याने हे काम कसं थांबवायचं यासाठी भाजपाकडून कटकारस्थान सुरू आहे. असा आरोप मलिक यांनी केलेला आहे.

Protected Content