ऊस तोड मजूर मेळाव्याच्या आयोजकांवर गुन्हा

नगर: वृत्तसंस्था । वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या ऊस तोडणी कामगारांच्या मेळाव्याच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारींच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी भगवानगडाच्या पायथ्याशी खरवंडी कासार (ता. पाथर्डी) येथे दसऱ्यानिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.ऊसतोड कामगार संघटनेचे दादासाहेब खेडकर, शिवराज बांगर, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिक बारसे, अरुण जाधव, अनिल जाधव, अमित भूईगल, संदीप शिरसाठ यांच्यासह इतर दोन ते तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दसऱ्याच्या निमित्ताने खरवंडी येथे ऊसतोडणी कामगार संघटना, मुकादम, वाहतूकदार यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रकाश आंबेडकर हे देखील आले होते. मात्र, आता या मेळाव्याच्या आयोजकांवरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामुळे मानवी जीवितास धोका निर्माण होईल, अशी कृती झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Protected Content