वाफाळलेल्या चहासोबतच्या गप्पांनी फुलतो एम. आर. कट्टा ! ( व्हिडीओ )

जळगाव सचिन गोसावी । मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह अर्थात एम. आर. हा वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय महत्वाचा व खरं म्हटलं तर हा अतिशय उपेक्षित घटक. अतिशय धावपळीत आणि तणावात काम करणारा ! याच एम.आर.प्रोफेशनल्सच्या कृतज्ञतेसाठी जळगावातील एका व्यावसायिकाने आपल्या हॉटेलचे नाव एम.आर. कट्टा असे ठेवले आहे. वाफाळता चहा व स्नॅक्ससोबत येथे बहुतांश एम.आर. बांधव एकमेकांसोबत संवाद साधतात.

शहरातील जुने बी.जे. मार्केटसह परिसरात बहुतांश ख्यातनाम मेडीसीन होलसेल डीलर्स आहेत. अर्थात, हेच डीलर्स मेडिकल रिप्रेझेंटेटीव्हजचे स्टॉकीस्ट असतात. एम.आर. हे दिवसभरात डॉक्टर्सचे कॉल करून एक तरी फेरी आपल्या स्टॉकिस्टकडे टाकत असतात. आणि अर्थातच, याच फेरीत त्यांची अन्य एम.आर. सोबत भेट होत असते. बी.जे. मार्केट परिसरातील एजन्सीजमधील अशाच शेकडो एम.आर. ची ये-जा असते. आणि या सर्व मंडळीला निवांत गप्पा मारण्यासाठी या भागातील एक हॉटेल प्रसिध्द झाले आहे. अर्थात, या हॉटेलचे मालक आणि एम.आर. बांधव यांच्यात इतका भावबंध घट्ट झालाय की, त्यांनी आपल्या या हॉटेलचे नाव एम. आर. कट्टा असे ठेवले आहे.

नावातच नमूद असल्यानुसार एम. आर. कट्टा हा मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह यांच्याप्रती असणार्‍या कृतज्ञेतून उभा राहिला आहे. येथे चहा-कॉफीसह सर्व प्रकारचे स्नॅक्स उपलब्ध आहे. अर्थात, दर्जेदार खाद्यपदार्थ व निवांत गप्पा मारण्याच्या सुविधेमुळे येथे मोठ्या प्रमाणात एम.आर. मंडळी येते हे सांगणे नकोच. अर्थात, एम.आर. सोबत डॉक्टर, वकील आणि अन्य सर्वसामान्य ग्राहकांचाही येथे मोठ्या प्रमाणात राबता असतो असे एम.आर. कट्टाचे संचालक शेखर साळुंखे यांनी आवर्जून सांगितले.

गेल्या सुमारे चार वर्षांपासून एम.आर. कट्टा सुरू आहे. येथे एम.आर. बांधव हे एकमेकांशी गप्पांमधून सुख-दु:खासह व्यावसायिक बाबींचे शेअरिंग करत असतात. त्यांचे वरिष्ठ पातळीवरील मॅनेजर्स आल्यावर त्यांना देखील इथे आवर्जून आणले जाते. यातील अनेक जण एम.आर. कट्टा पाहून आणि अर्थातच आपल्या क्षेत्राबाबतच्या आपुलकिच्या भावनेने खूश होत असल्याचे येथील एम.आर. बांधवांनी आवर्जून सांगितले. अर्थात, आपण देखील वेळात वेळ काढून कधी तरी या कट्टयावर जाण्यास काहीही हरकत नाही.

खालील व्हिडीओत पहा एम.आर. कट्टयाबाबतचा विस्तृत वृत्तांत.

https://www.facebook.com/508992935887325/videos/709747526394544

एम.आर. कट्टयाचे मॅप्सवरील लोकेशन खाली दिलेले आहे.

Protected Content