Birthday Special : जगजीत सिंह यांची टॉप-१० हृदयस्पर्शी गाणी (व्हिडीओ)

आज गजल सम्राट जगजीत सिंह यांची जयंती. गजलेला नवीन उंची प्रदान करणार्‍या या महान गायकांची अनेक गाण्यांनी रसिकांना भावविभोर केले आहे. आज जयंतीमित्त त्यांच्या कारकिर्दीचा हा सूरमय प्रवास.

जगजीत सिंह धीमान यांचा जन्म गंगानगर राजस्थान येथे ९ फेब्रुवारी १९४१ रोजी झाला होता. बालपणापासूनच गायनाची आवड असल्यामुळे वडिलांनी त्यांना पंडित छगनलाल शर्मा आणि उस्ताद जमाल खान यांच्याकडे शास्त्रीय संगीताच्या शिक्षणासाठी पाठवले. पदवी संपादन केल्यानंतर १९६१ मध्ये त्यांनी ऑल इंडिया रेडीओत नोकरीस प्रारंभ केला. नंतर मात्र गायकीमध्ये करियर करण्यासाठी त्यांनी १९६५ साली मुंबई गाठली. चित्रपटसृष्टीत लवकर संधी न मिळाल्याने त्यांनी जिंगल गायनास प्रारंभ केला. दरम्यान १९६७ मध्ये त्यांची चित्रा यांच्याशी भेट झाली. १९६९ मध्ये जगजीत व चित्रा विवाहबध्द झाले. विशेष म्हणजे चित्रा या आधी विवाहीत होत्या. त्यांना आधी मुलगीदेखील होती. ही मुलगी सिंग दाम्पत्यासोबतच राहिली. यानंतर जगजीत आणि चित्रा यांनी नॉन-फिल्मी अल्बम्सच्या माध्यमातून अलोट लोकप्रियता मिळवली. सत्तरच्या दशकाच्या मध्यानंतर जगजीत व चित्रा यांना बॉलिवुडचे दरवाजे खुले झाले. मात्र त्यांनी अतिशय मोजके व दर्जेदार गाणीच निवडली.

१९९० साली जगजीत व चित्रा यांचा मुलगा विवेकचा वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी अपघाती मृत्यू झाला. या दुर्घटनेने हे दाम्पत्य अक्षरश: कोलमडून पडले. चित्रा सिंह यांनी यानंतर कधीही गायन केले नाही. तर जगजीत हेदेखील अनेक महिने या धक्क्यातून बाहेर पडू शकले नाही. यानंतर जगजीत यांच्या आवाजातील वेदनेने विविध गाण्यांच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. १० ऑक्टोबर २०११ रोजी हा महान गायक आपल्याला सोडून गेला. आज त्यांच्या जयंतीचे निमित्त साधून त्यांची गाजलेली गाणी आपल्यासाठी सादर करत आहोत. खरं तर, जगजीतजींच्या विपुल गाण्यांमधून कोणते उजवे व कोणते डावे याची निवड करणे कठीण आहे. मात्र अभिजातपणा आणि लोकप्रियता या दोन्ही कसोट्यांवर केलेली ही टॉप-१० गाण्यांची निवड आपल्याला निश्‍चितच आवडेल.

१) वो कागज की कश्ती : ‘बालपण देगा देवा’ असे आपल्या सर्वांना वाटते. नेमकी हीच भावना व्यक्त करणारी ‘वो कागज की कश्ती’ ही जगजीत सिंह यांची अजरामर गझल होय. याला आपण कितीदाही ऐकले तरी मन भरतच नाही.

२) होशवालो को खबर क्या : प्रेमातील मुग्धता वर्णन करणारे हे नितांतसुंदर गाणे सरफरोश या चित्रपटातील आहे. निदा फाजली यांचा कलाम, जगजीत यांचा स्वर आणि नसीरूद्दीन शाह, आमिर खान व सोनाली बेंद्रे यांच्यावरील चित्रीकरणाचा अफलातून योगायोग यात घडून आला आहे.

३) चिठ्ठी ना कोई संदेस : एखाद्या व्यक्तीचे नसणे हे किती वेदनादायी असते याची तीव्रता आपल्याला या गाण्यातून जाणून घेता येते. जगजीत यांच्या आयुष्यातील दु:खाची ही उत्कट अभिव्यक्ती असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

४) कही कही से हर चेहरा : ‘दिल कही होश कही’ या अल्बममधील हे गाणेदेखील प्रेमाचे एक विलोभनीय रूप उलगडून दाखवणार आहे. ”…अब भी यू मिलते है फुल चमेली के…जैसे इनसे अपना कोई रिश्ता लगता है । तुमको भूल ना पायेंगे हम एैसा लगता है ॥” अशा नजाकतभर्‍या शब्दांनी हे गाणे सुगंधीत झाले आहे.

५) ओठो से छु लो तुम : ‘प्रेमगीत’ या चित्रपटातील हे गाणे जगजीत यांच्या मुलायम सूरांनी अजरामर झाले आहे. आदर्श प्रेम आणि आयुष्यातील जीवघेणे एकाकीपण यांना एकाच गाण्यात गुंफण्याची किमया या माध्यमातून करण्यात आली आहे.

६) गम का खजाना तेरा भी है मेरा भी ! : ‘सजदा’ या अल्बममधील हे गाणे जगजीतजींना लता मंगेशकर यांच्यासोबत गायले आहे. वयाच्या एका नाजूक वळणारवर आकस्मीक सामना झालेल्या प्रेमिकांची दग्ध अवस्था यात व्यक्त करण्यात आली आहे.

७) किसका चेहरा अब मै देखू…तेरा चेहरा देखकर ! :- ‘तरकीब’ या चित्रपटातील हे गाणेदेखील प्रेमाची एक अतिशय विलोभनीय अवस्था वर्णन करणारे आहे. जगजीतजींच्या मखमली आवाजाने या गाण्याला विलक्षण उंची प्रदान केली आहे.

८) जब सामने तुम आ जाते हो :- या अतिशय मनमोहक अशा गाण्यात जगजीत सिंह यांना आशा भोसले यांनी समर्थ साथ दिली आहे. हे गाणेदेखील ‘दिल कही होश कही’ या अल्बममधील आहे.

९) तुमको देखा तो ये खयाल आया – ‘साथ साथ’ या चित्रपटातील जगजीतजींचे हे गाणे ऑल टाईम ग्रेट गाण्यांमध्ये गणले जात आहे. हम जिसे गुनगुना नही सकते…वक्त ने ऐसा गीत क्यू गाया या ओळी तर लाजवाबच !

१०) तुम इतना जो मुस्कुरा रहे हो :- प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा हा प्रसंग या गाण्यात अतिशय विलक्षण पध्दतीत सादर करण्यात आला आहे. हृदयातील घाव आणि ओठांवरील हास्याची विसंगती यातून मार्मीकपणे अभिव्यक्त झाली आहे.

Add Comment

Protected Content