
मुंबई-वृत्तसेवा । मराठी दूरचित्रवाणी विश्वातील चर्चित मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ अवघ्या पाच महिन्यांत प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर यांनी साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. मात्र मालिका अल्पावधीत संपत असल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत असतानाच अमोल कोल्हे यांची लोकप्रिय ऐतिहासिक मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेने समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांसमोर मांडला. सामाजिक परिवर्तन, स्त्रीशिक्षण आणि समतेचा संदेश देणाऱ्या या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र ही मालिका १४ जून रोजी संपणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मालिकेच्या समाप्तीच्या पार्श्वभूमीवर डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “जेव्हा एक मार्ग बंद होतो, तेव्हा कुठेतरी नवी सुरुवात खुणावत असते. थोडंसं थांबणं आवश्यक असतं आणि पुन्हा नव्या जोमाने झेपावण्यासाठी नव्याने गणितं मांडावी लागतात,” अशा आशयाचे शब्द त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहेत. त्यांच्या या पोस्टनंतर मालिकेच्या समाप्तीबद्दल चाहत्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
एकीकडे ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका संपत असताना दुसरीकडे झी मराठी वाहिनीने प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. डॉ. अमोल कोल्हे यांची ऐतिहासिक आणि अत्यंत लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा एकदा प्रसारित केली जाणार आहे. वाहिनीने यासंदर्भातील अधिकृत प्रोमो प्रसिद्ध करत मालिकेच्या पुनर्प्रसारणाची घोषणा केली आहे. झी मराठीने प्रसिद्ध केलेल्या प्रोमोमध्ये “शंभूराजांच्या पराक्रमाचा इतिहास पुन्हा एकदा उलगडणार” असा संदेश देण्यात आला आहे. ही मालिका ८ जूनपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ६ वाजता प्रसारित होणार आहे. या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला असून मालिकेच्या पुनरागमनाचे स्वागत केले आहे.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका मराठी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि स्वराज्य रक्षणासाठीच्या संघर्षाची गाथा या मालिकेत प्रभावीपणे साकारण्यात आली होती. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विशेष गाजली होती आणि त्यातून त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेच्या पुनर्प्रसारणामुळे नव्या पिढीला इतिहासाची ओळख होण्यास मदत होईल, अशी भावना अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे. तसेच पूर्वी ही मालिका पाहिलेल्या चाहत्यांनाही पुन्हा एकदा शंभूराजांच्या पराक्रमाचा इतिहास अनुभवण्याची संधी मिळणार आहे.



