Home राज्य TET पेपरफुटी प्रकरणाची स्वतंत्र चौकशी ; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

TET पेपरफुटी प्रकरणाची स्वतंत्र चौकशी ; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

0
3

पुणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मधील कथित पेपरफुटी व गैरप्रकारांबाबत स्वतंत्र आणि सखोल चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान भरून काढणे तसेच परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या मागण्यांवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने विविध मुद्द्यांवर माहिती दिली आहे. संबंधित प्रकरणांमध्ये पोलिस तपास सुरू असून, गैरप्रकारात सहभागी आढळलेल्या उमेदवारांवर परीक्षा परिषद स्तरावर कारवाई करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

TET परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांची स्वतंत्र चौकशी करून डिजिटल पुराव्यांची आवश्यकतेनुसार फॉरेन्सिक तपासणी करावी, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि या प्रकरणांची जलदगतीने सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर संबंधित प्रकरणात पोलिस यंत्रणेमार्फत तपास व पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती परीक्षा परिषदेकडून देण्यात आली आहे. डिसेंबर २०२१ मधील TET परीक्षेतील गैरप्रकाराच्या प्रकरणात सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे परिषदेकडून नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात गैरप्रकारात सहभागी आढळलेल्या उमेदवारांविरुद्ध परीक्षा परिषद स्तरावर संपादन रद्द करून कायमस्वरूपी प्रतिबंधाची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांची यादीही परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गैरप्रकारातील दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच संबंधित प्रकरणांची न्यायालयीन बाजू सक्षमपणे मांडण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली होती. काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत पुढील कार्यवाही न्यायालयीन प्रक्रियेनुसार होणार असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

TET परीक्षा प्रक्रियेत भविष्यात पेपरफुटी अथवा गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी प्रश्नपत्रिका तयार करणे, छपाई, वाहतूक, साठवणूक आणि वितरण या संपूर्ण प्रक्रियेत सुरक्षा उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी आणि छपाईसाठी स्वतंत्र गोपनीय यंत्रणांचा वापर केला जात असून, प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचेपर्यंत विविध टप्प्यांवर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येते. गोपनीय प्रेसमध्ये प्रश्नपत्रिकांची छपाई करून केंद्रनिहाय पाकिटे तयार केली जातात. त्यानंतर ती सीलबंद बॉक्समध्ये ठेवून जिल्हास्तरीय कस्टडीमध्ये पाठविली जातात. संबंधित ठिकाणी CCTV निगराणी आणि पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था केली जाते. परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकांचे बॉक्स पोहोचविताना तसेच परीक्षा सुरू करण्यापूर्वीही आवश्यक सुरक्षा प्रक्रियेचे पालन केले जाते. परीक्षा केंद्रावर उमेदवारांच्या उपस्थितीत प्रश्नपत्रिकांची पाकिटे उघडण्याची प्रक्रिया केली जाते. त्यामुळे प्रश्नपत्रिकेची गोपनीयता कायम ठेवण्यासाठी परीक्षा परिषदेच्या स्तरावर विविध सुरक्षा उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले आहे.

पेपरफुटी, गैरप्रकार अथवा प्रशासकीय कारणामुळे परीक्षा रद्द झाल्यास किंवा परीक्षा प्रक्रियेत विलंब झाल्यास विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणीही करण्यात आली होती. अशा परिस्थितीत पुनर्परीक्षा आयोजित करताना परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले असून, परीक्षा प्रक्रियेतील विलंबामुळे वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना अतिरिक्त संधी अथवा वयोमर्यादेबाबत सवलत देण्याच्या मागणीवर शासनस्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक TET परीक्षेनंतर अधिकृत उत्तरतालिका, उमेदवारांची Response Sheet आणि गुणांकन प्रक्रिया निश्चित कालावधीत सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत परिषदेकडून सांगण्यात आले की, परीक्षा झाल्यानंतर अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध केली जाते. त्यावर उमेदवारांना ऑनलाइन आक्षेप नोंदविता येतात. तज्ज्ञांच्या माध्यमातून या आक्षेपांचे निरसन केल्यानंतर अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करून त्यानुसार निकाल जाहीर केला जातो. TET परीक्षेतील निकालाचे प्रमाण सातत्याने कमी का राहते, याचा तज्ज्ञ समितीमार्फत अभ्यास करून अहवाल सार्वजनिक करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि मूल्यांकन प्रक्रियेचा आवश्यकतेनुसार पुनर्विचार करण्याबाबतही मागणी करण्यात आली आहे.

शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या रिक्त जागांवरील नियुक्तीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता. याबाबत शासनाच्या निर्देशानुसार भरती प्रक्रियेची कार्यवाही सुरू असल्याची माहिती परिषदेकडून देण्यात आली आहे. दरम्यान, TET परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर उमेदवारांना संबंधित उत्तरपत्रिकेची प्रत देण्यात येते. त्यानंतर अंतरिम उत्तरसूची जाहीर करून ऑनलाइन आक्षेप मागविले जातात. प्राप्त आक्षेपांचे तज्ज्ञांकडून निरसन करून अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध केली जाते आणि त्यानंतर निकाल जाहीर केला जातो, अशी परीक्षा प्रक्रियेची माहिती परिषदेकडून देण्यात आली आहे. TET परीक्षेचा अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका आराखडा शासन निर्णय तसेच राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार करण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विचार करून परीक्षा पद्धती निश्चित केली जात असल्याचे परिषदेकडून नमूद करण्यात आले आहे.

सेवेत असलेल्या शिक्षकांना TET पात्रतेबाबतच्या तरतुदींचा पुनर्विचार करण्याची मागणीही करण्यात आली होती. या संदर्भातील न्यायालयीन निर्णय आणि शासनाच्या निर्देशांनुसार पुढील कार्यवाही केली जात असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच काही मागण्या या धोरणात्मक स्वरूपाच्या असल्याने त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शासनस्तरावर असल्याचे सांगण्यात आले आहे. एकूणच, TET परीक्षेतील गैरप्रकारांबाबत पोलिस तपास, उमेदवारांवरील कारवाई, परीक्षा प्रक्रियेतील सुरक्षा व्यवस्था, उत्तरतालिका व Response Sheet प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया आणि पुनर्परीक्षेबाबत शासनस्तरावरील कार्यवाही याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याची मागणी या पार्श्वभूमीवर पुन्हा ऐरणीवर आली आहे.


Protected Content

Play sound