जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि लोकप्रिय पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या नुकत्याच झालेल्या निधनानंतर त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी परिवर्तनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष स्वरांजली कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमनताईंच्या अजरामर गीतांनी सजलेल्या या कार्यक्रमातून त्यांच्या समृद्ध संगीत वारशाला भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, उपजिल्हाधिकारी मंजुषा घाडगे, सानिया ढिवरे, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. राजेंद्र चव्हाण, मालन चव्हाण, अनिश शहा आणि अनिल कांकरिया यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांनी दोन मिनिटे उभे राहून सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

सुमन कल्याणपूर यांनी आपल्या कारकिर्दीत मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक अविस्मरणीय गीते दिली. त्यांच्या सुरेल आवाजाची जादू आजही रसिकांच्या मनात तितकीच ताजी आहे. कार्यक्रमात त्यांच्या निवडक गीतांचे कोणत्याही वाद्यसाथीशिवाय सादरीकरण करण्यात आले. ‘देव माझा विठू सावळा’, ‘केशवा माधवा’, ‘सावळ्या विठ्ठला’, ‘जिथे सागरा’, ‘रिमझिम झरती’, ‘इतना है तुमसे प्यार हमें’, ‘जान चली जाये’, ‘दुनिया बनाने वाले’, ‘दिल ने फिर याद किया’, ‘अरे संसार संसार’, ‘केतकीच्या बनी’, ‘ना तुम हमें जानो’ आणि ‘रहे ना रहे हम’ यांसारख्या अजरामर गीतांनी कार्यक्रमाचे वातावरण भारावून गेले. या गीतांनी उपस्थितांना जुन्या सुवर्णकाळातील सुरेल आठवणींमध्ये रमण्याची संधी दिली. गायिका श्रद्धा कुलकर्णी आणि अंजली धुमाळ यांनी आपल्या मधुर आणि भावपूर्ण सादरीकरणातून सुमनताईंच्या गीतांना न्याय देत रसिकांची मने जिंकली. त्यांच्या गायनाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. कार्यक्रमाचे निवेदन शंभू पाटील यांनी केले. त्यांनी सुमन कल्याणपूर यांच्या संगीत प्रवासाचा सविस्तर आढावा घेत त्यांच्या कारकिर्दीतील अनेक संस्मरणीय प्रसंग, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदान तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू उलगडून सांगितले. आपल्या निवेदनातून त्यांनी सुमनताईंचे भारतीय संगीतविश्वातील स्थान कायम अजरामर राहील, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाची संकल्पना गोविंद मोकाशी यांची होती. सुदीप्ता सरकार आणि मंजुषा भिडे यांनी कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले. तर निर्मिती प्रमुख म्हणून नारायण बाविस्कर आणि भूषण गुरव यांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गणपती नगर येथील रोटरी क्लब तसेच प्रेमभाई कोगटा यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल निंबाळकर, अक्षय नेहे, जय सोनार आणि गणेश सोनार यांनी विशेष परिश्रम घेतले. सुमन कल्याणपूर यांच्या अमर गीतांनी सजलेला हा स्वरांजली कार्यक्रम त्यांच्या संगीत वारशाला दिलेली खरी आदरांजली ठरला. त्यांच्या स्वरांची जादू पुढील अनेक पिढ्यांनाही प्रेरणा देत राहील, अशी भावना उपस्थित रसिकांनी व्यक्त केली.



