आवास योजनेच्या यादीसाठी शिवसेना आक्रमक

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील पंतप्रधान आवास योजनेची दुसरी यादी त्वरित प्रसिद्ध करुन लाभार्थ्यांना न्याय द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.

दीपक धांडे, प्रा.धीरज पाटील, देवेंद्र पाटील, अ‍ॅड. नरेंद्र लोखंडे यांनी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना एक निवेदन दिले. यात नमूद केले आहे की, शहरातील लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून आपले हक्काचे घरे होईल, अशी आशा आहे. त्यासाठी अनेकांनी पालिकेकडे पंतप्रधान आवास योजनेचा अर्ज भरून सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. मात्र, प्रशासनाने अजूनही पंतप्रधान आवास योजनेची दुसरी यादी प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे गोरगरीब लाभार्थ्यांची चिंता वाढली आहे. हे सर्व लाभार्थी लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या तयारीत आहेत. हे आंदोलन टाळण्यासाठी लवकरात लवकर पंतप्रधान आवास योजनेची दुसरी यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी यात करण्यात आलेली आहे.

दरम्यान, यासोबत भुसावळ पालिकेतील वर्ग-४ कर्मचार्‍यांना पदोन्नती, पालिकेतील ११ कर्मचारी अनेक वर्षांपासून वर्ग-४ मध्ये आहेत. तरीही त्यांच्याकडून लिपिक, टंक लेखकाची कामे करून घेतली जातात. या कर्मचार्‍यांना पदोन्नती मिळावी यासाठी २९ एप्रिल २०१९ रोजी पालिकेने जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यांना पदोन्नती मिळावी, अशी मागणी शिवसेनेने या निवेदनात केली आहे.

Protected Content