निखील राजपूतसह टोळीतील सात जणांवर ‘मोक्का’ : भुसावळात खळबळ

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील कुख्यात गुन्हेगार निखील राजपूत याच्यासह त्याच्या टोळीतील सात जणांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारी क्षेत्र हादरले आहे. भुसावळातील अजून काही गुन्हेगारांवर हद्दपारी आणि मोक्काची कारवाई होण्याचे संकेत देखील आता मिळाले आहेत.

निखील राजपूत आणि त्याच्या सहकार्‍यांनी काही महिन्यांपूर्वी पोलिसांवर हल्ला चढविला होता. हाच निखिल राजपूत व टोळीतील सहा साथीदार अशा ७ जणांविरुद्ध दाखल ‘मोक्का’ म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांनी मंजुरी दिली आहे.

नियनामुनार लवकरच मोक्काची कारवाई झालेल्या राजपूत टोळीतील सर्व ७ जणांना पोलिस अटक करून रवानगी कारागृहात करतील. नंतर सहा महिन्यांत पोलिसांना न्यायालयात संबंधितांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करावे लागेल. त्यात तपास पूर्ण न झाल्यास पुन्हा मुदतवाढीची विनंती पोलिस करू शकतात.

भुसावळातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी अलीकडेच अनेक गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहेत. तर निखील राजपूतसह त्याच्या टोळीला मोक्का लावल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. लवकरच इतर गुन्हेगारांवरही याच प्रकारची कारवाई होण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, राजपूत व त्याचे साथीदार हे पोलिसांवरील हल्ल्याच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आहेत. आता मोक्काची कारवाई झाल्याने त्यांचे जामीन रद्द करावे, असा अर्ज पोलिस प्रशासनाने न्यायालयात दिला असून यावर आज सुनावणीची शक्यता आहे.

Protected Content